राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरही शिवसेना आणि भाजपा यांच्यातलं शाब्दीक द्वंद्व अद्याप सुरु आहे. शनिवारी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर बोचरी टीका केली. शिवसेनेने भाजपाचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी…अशा भाषेत सेनेने भाजपाला टोला लगावला आहे.

शिवसेनेच्या या टीकेवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचं ३० वर्ष ओझं असेल…तर आता दोघांना सोबत घेतलं आहे ती ओझ्याची गाढवं आहेत का?? अशा शब्दांत शेलारांनी सेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेसाठी दरवाजे अजूनही खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं.

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

भाजपा म्हणजे ‘भारत जलाओ पार्टी’ आहे अशी बोंब ज्यांनी ठोकली होती ते रामविलास पासवान मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मोदी यांना खालच्या शब्दात टोले मारणारे नितीशकुमार हे बिहारात भाजपच्या टेकूवर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणी कोणावर बोलायचे? भारतीय जनता पक्षाचेच नेते देशाच्या प्रश्नांवर, जनतेच्या मागण्यांवर मूग गिळून बसले आहेत. पण भावनिक विषयांवर तोंड फाटेपर्यंत बोलत आहेत. काँग्रेस पक्षातून टनावारी माणसं फोडून आपल्या पक्षात घ्यायची आणि सत्ता मिळवायची हे ज्यांना चालते त्यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले वगैरे अशी वक्तव्यं करण्याच्या भानगडीत पडू नये. देवेंद्र फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे. त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल.

भाजपाचे ओझे फक्त शिवसेनेनेच उतरवले नाही तर भाजपाची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले व हवा मोकळी झाल्याचे वातावरण निर्माण झाले. ओझे व ताण इतका उतरला की, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. खडसे यांना आता इतके मोकळे वाटू लागले आहे की, ते एकाच वेळी पवारांना भेटतात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतात. माझा निर्णय घ्यायला मी मोकळा असल्याचे ते हिमतीने सांगतात. पंकजा मुंडे यांचीही भूमिका वेगळी नाही. प्रत्येकजण मनावरील ओझे फेकून देत आहे व मोकळा श्वास घेत आहे.

महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेस दगा दिला व हे दगानाट्य ठरल्याप्रमाणेच झाले. २०१४ मध्ये एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा मोठय़ा गर्वात केली. आज खडसे इतरांच्या पायऱ्या झिजवत आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी.

भाजपाचे ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने खिडकीत बसून ‘शुक शुक’ करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजविणे बंद केले पाहिजे.