जिल्ह्य़ातील दोन आमदारांकडून पर्यायी मार्गाचा शोध

वसंत मुंडे, बीड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत परळीत झालेल्या निर्धार परिवर्तन मेळाव्याकडे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पाठ फिरवल्यामुळे पक्षाच्या एकमेव आमदाराचाही राजकीय मार्ग बदलल्याचा संदेश गेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील परळीतील कार्यक्रमाकडेही भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनीही गैरहजेरी लावून तेही पक्ष नेतृत्वापासून दुरावले की काय, असे चित्र निर्माण झाल्याने दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बीड जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण तापू लागले असतानाच राजकीय सोयीनुसार नेत्यांचे मार्गही बदलू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर व डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे मागील दोन वर्षांपासून पक्ष नेतृत्वाने बंडखोर पुतणे संदीप क्षीरसागर यांना पाठबळ दिल्यानंतर पक्षाच्या जाहीर कार्यक्रमापासून अलिप्त आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विजयी संकल्प मेळाव्याच्या नियोजनापासून पूर्णपणे दूर ठेवलेल्या क्षीरसागरांना ऐन वेळी शरद पवारांनी कार्यक्रमात बोलवून भाषण करण्याचीही संधी दिली. त्यामुळे क्षीरसागर पुन्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसू लागल्याने अंतर्गत समेट झाल्याचे चित्र उभे राहिले. मात्र मागील महिन्यात क्षीरसागर बंधूंनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन विकासासाठी आम्ही कोणाच्याही दारात जाऊ असे सूचक वक्तव्य करुन भाजपच्या जवळ गेल्याचे स्पष्ट केले होते. या पाश्र्वभूमीवर शरद पवारांच्या उपस्थितीत परळीत होणाऱ्या निर्धार परिवर्तन मेळाव्याच्या जाहिरात फलकावरुन क्षीरसागर गायब झाले. पक्षाचे प्रमुख नेते येणार असल्याने क्षीरसागर येणार का, याची उत्सुकता होती. मात्र क्षीरसागरांनी मेळाव्याकडे पाठ फिरवून आपला मार्ग बदलल्याचे स्पष्ट केले आहे. तर परळीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला पक्षाचे गेवराईतील आमदार लक्ष्मण पवारही गरहजर होते. यापूर्वीही बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला पवार यांनी दांडी मारली होती. त्यामुळे भाजप नेतृत्वापासून आमदार पवार दूर गेल्याचे चित्र उभे राहिले आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत गेवराईतील शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्याशी युती केल्यापासून आमदार लक्ष्मण पवार नाराज असल्याचे बोलले जात होते.

भाजपबरोबर युती झाल्याने सेनेकडून जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे गेवराई मतदारसंघ सेनेला सुटला तर या शक्यतेने आमदार लक्ष्मण पवार समर्थक अस्वस्थ आहेत. यातून लक्ष्मण पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाकडे आणि औरंगाबाद येथे झालेल्या बुथ प्रमुखांच्या बठकीकडेही पाठ फिरवल्याचे मानले जात असून ते नव्या राजकीय पर्यायाचा शोध घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.