सध्या राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडक निर्बंध लागू करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन, मास्कचा वापर व हात धूणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. एवढंच नाहीतर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत. एकीकडे मुख्यंत्री स्वतः करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आटापीटा करत असताना, दुसरीकडे वरळीचे आमदार व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील क्लब व पबमधील काही व्हिडिओ रविवारी व्हायरल झाले, ज्यामध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. या व्हिडीओमध्ये करोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे!” असं नितेश राणे यांनी ट्वटि केलं आहे.

या अगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. वरळीच्या लोकांचं म्हणणं त्यांचे आमदार आणि लोकप्रतिनिधींच पूर्णपणे ऐकतात. त्यामुळेच करोनाच्या काळामध्ये आपल्याला नाईट लाइफ पहायला मिळत आहे, असं फडणवीस आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता म्हणाले होते.

“सोशल डिस्टन्सिंग केवळ शिवजयंती करता असतं, ते नाईट लाईफसाठी थोडीय”

तसेच पुढे बोलताना, “११ ची मर्यादा त्या ठिकाणी नाही. रात्रभर तिथे क्लब, पब तिथे सुरु आहेत. कोणतंही सोशल डिस्टन्सिंग तिथे पाळलं जात नाही. सोशल डिस्टन्सिंग केवळ शिवजयंती करता असतं ते नाईट लाईफसाठी थोडी आहे? त्या करता आदेश मिळालेत की नाईट लाईफ चाललंच पाहिजे,” असं देखील उपरोधात्मकपणे फडणवीस यांनी बोलून दाखवलं होतं.