राज्य सरकारने आता अनेक व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी सलून व्यवसाय सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. याच मुद्द्यावरुन भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खोचक शब्दात टीका केली आहे. “लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेक गोष्टींवरील निर्बंध उठलेले असताना नाभिक समाजावरच अन्याय का केला जात आहे. माननीय मुख्यमंत्री रोजच अगदी टापटीप दिसतात. ते केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच आहे,” अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली आहे. कोकणला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणी दौऱ्यावर असणाऱ्या लाड यांनी मंगळवारी गुहागरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.

लॉकडाउनचे नियम शिथिल करत अनेक उद्योग व्यवसायांना परवानगी देण्यात आली असली तरी सलून व्यवसाय सुरु करण्यात परवानगी देण्यात आलेली नाही. ती त्वरीत द्यावी आणि नाभिक समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी राज्यभरात नाभिक समाजाकडून आंदोलन केली जात आहेत. कोकणामध्येही नाभिक समाजाने हत्यारबंद आंदोलनाची हाक दिली आहे. याचसंदर्भात लाड यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दात उत्तर दिलं. “आमच्या दाढ्या वाढल्यात. मात्र मुख्यमंत्री रोजच टापटीप दिसतात. ते केस कुठं कापतात हा प्रश्न आम्हाला पडलाय. खरं म्हणजे नाभिक समाजावर अन्याय करण्याचं काहीच कारण नाही. एकीकडे तुम्ही मॉल, हॉटेल आणि इतर व्यवसायांना पारवानगी देता. आणि दुसरीकडे एका टक्क्यापेक्षाही कमी असलेल्या नाभिक समाजावर अन्याय का केला जात आहे?,” असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला. ज्याप्रकारे इतर व्यवसायांसाठी नवे नियम लावून त्यांना परवानगी देण्यात आली त्याच प्रकारे करोनाचा धोका टाकण्यासंदर्भातील नवे निमय नाभिक समाजासाठी जारी करुन त्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी असंही लाड यांनी म्हटलं आहे.

कोकणासाठी मदत अपुरी

निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या कोकणाला ठाकरे सरकारने केलेली ७५ कोटींची मदत अपुरी असल्याचे मत लाड यांनी व्यक्त केलं. कोकणामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. घरांचेही मोठे नुकसान झालं आहे. असं असताना सरकारने केवळ ७५ कोटींची मदत दिली असून रस्त्यावरील झाडं उचलण्यासाठीही हा निधी पुरणार नाही असा टोला लाड यांनी लगावला. इतका कमी निधी देऊन कोकणातील लोकांची ठाकरे सरकारने फसवणूक केल्याचा आरोप लाड यांनी केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे केवळ तहसीलदार आणि तलाठ्यांना भेटून गेले. गावाची पाहणी करण्यासाठी ते आले नाहीत. हे येथील जनतेला गृहीत धरल्याचे लक्षण आहे. कोकणातील जनता शिवसेनेची प्रॉपर्टी असल्यासारखी त्यांची वागणूक आहे, असा टोलाही लाड यांनी लगावला.