धनंजय मुंडेंसह पक्षाचे आमदार धोंडेंवरही टीका

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्याविषयी वाट्टेल त्या पोस्ट प्रसारित केल्या जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फेक अकाउंटवर चालतो, असा आरोप करून भाजपचे आमदार सुरेश धस  यांनी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबतच आपल्याच पक्षाचे आमदार भीमराव धोंडे यांच्यावरही टीका केली.

बीड जिल्ह्यतील आष्टी येथील निवासस्थानी रविवार आयोजित पत्रकार बैठकीत आमदार धस बोलत होते. ते म्हणाले, समाज माध्यमांचा गैरवापर करून काही कार्यकत्रे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. कधी मुख्यमंत्री तर कधी ग्रामविकासमंत्री यांच्याविषयी पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत. मनाला वाटेल त्या प्रमाणे पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत. राष्ट्रवादीकडून समाज माध्यमातील एका विशिष्ट प्रणालीचा वापर करत पैसे देऊन जास्तीची पसंती मिळवली जात आहे. हा पक्ष सध्या फेक अकाउंटवरच चालतो, असाही आरोप धस यांनी केला. अशा फेक अकाउंटचा शोध घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आपण केली असल्याचे त्यांनी सांगितले.

समाज माध्यमात पैसे देऊन स्वतची पसंती वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे, असा देखावा केला जात असल्याची टीकाही धस यांनी केली. सध्या दोन व्यक्तींच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून अनेकांची बदनामी केली जात आहे. त्या दोन व्यक्तींना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सर्व नागरिकांसमोर उभे करून दाखवावे, असे आव्हान देत त्या दोन्ही व्यक्तींना लोकांसमोर उभे केल्यास मी राजकारण सोडून देईन, असेही धस म्हणाले.

धोंडेंनी श्रेय घेऊ नये

आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव धोंडे यांच्यावरही सुरेश धस यांनी टीका केली. वनवेवाडी ते िहगणी आणि देऊळगाव घाट ते मिच्छद्रनाथगड या रस्त्याची कामे मी मंजूर करून आणली आहेत. या प्रश्नी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचे सांगून आमदार धोंडे यांनी मी केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये, असा टोला लगावला.