आज जमाना मार्केटिंगचा आहे आणि विक्री व्यवस्थापन कौशल्य, ब्रँडिंग याला भलताच भाव आहे. त्यामुळे उत्पादनाच्या विक्री प्रोत्साहनास ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर हवाच. विदर्भातील गोड व मधुर संत्र्यांना तितकाच गोड व सुंदर ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर असला पाहिजे. पण सेलिब्रिटी, खेळाडू यापेक्षा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विदर्भातील प्रमुख पीक असलेल्या संत्र्याचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर व्हावे, अशी इच्छा मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली. त्यामुळे राजकारणाच्या धकाधकीत असलेल्या मुख्यमंत्र्यांना आता ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर होण्याची ऑफर आहे.
रुबाबदार, देखणे आणि एकेकाळी जाहिरातही केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १२ कोटी जनतेला दररोज किमान एक संत्रे खाण्यासाठी उद्युक्त केले, तर त्याचा संत्री उत्पादकांना निश्चितच लाभ होईल, असे त्यांना वाटते. संत्र हे फळ अतिशय आरोग्यदायी असून त्यात कोणते घटक असतात, याची माहिती देणारी पत्रकेच डॉ. बोंडे यांनी काढली आहेत. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांपासून ते प्रत्येक मंत्र्याला तीन किलो संत्र्याची पेटी १०० रुपयांना देऊन संत्र्यांची विक्री करण्यास प्रोत्साहन देण्याची विनंती करीत आहेत.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही १०० रुपयांना संत्र्याची पेटी देताना, शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात संत्री दिली जावीत, अशी मागणी त्यांनी केली. तावडे यांनी त्यास लगेच अनुकूलताही दाखविली. रुग्णांनाही ऊर्जा देणारे संत्र हे दैनंदिन कामाचा ताण व वादांमुळे त्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यांना अधिक ऊर्जा देईलच आणि ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर झाल्यास विरंगुळाही मिळणार आहे.