विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकारचे हे पहिलचे अधिवेशन असून शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्दय़ांवरून हे अधिवेशन चांगलेच तापण्याचे संकेत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाच निषेध म्हणून, या अगोदरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असे वाक्य लिहिलेली भगवी टोपी घालून विधीमंडळ परिसरात प्रवेश केला आहे.

शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुसरीकडे, आम्ही वचन पाळणारे लोक असून शेतकऱ्यांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत भाजपच्या सावरकरप्रेमावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नखाचीही सर नाही आणि स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक अजिबात करू नये. केवळ गांधी आडनाव असल्याने कोणीही ‘गांधी’ होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता.