News Flash

‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’, सुरेश धस यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

पुढील काळात राष्ट्रवादीने घड्याळाएवजी कीचेन, स्मार्टफोन, कॅमेरा अशी चिन्हे घेऊनच निवडणूक लढवावी. हा विजय धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीने दिला आहे.

Suresh Dhas: उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांना धूळ चारीत तब्बल ७६ मतांनी विजय मिळवला.

मतदारांना स्मार्टवॉच, कीचेन, आयफोन वाटूनही राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पुरस्कृत उमेदवाराला पराभवापासून वाचवता आले नाही. त्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पुढील काळात राष्ट्रवादीने घड्याळाएवजी कीचेन, स्मार्टफोन, कॅमेरा अशी चिन्हे घेऊनच निवडणूक लढवावी. हा विजय धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीने दिला आहे. शेवटी ‘बेटा बेटा, और बाप बाप होता है’ अशा खोचक शब्दात भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. विधान परिषदेच्या निकालानंतर ते बोलत होते.

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांना धूळ चारीत तब्बल ७६ मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा त्यांनी एकहाती पराभव केला. जगदाळे यांना ४५१ तर सुरेश धस यांना ५२७ मतदारांनी आपले समर्थन दिले. मतमोजणीत एक हजार तीन मतदारांपैकी तब्बल २५ मते बाद ठरविण्यात आली. भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचा हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी जोरदार धक्का तर पंकजा मुंडे यांच्याकरिता ऐतिहासिक विजय मानला जात आहे.

निवडणुकीत आपल्याला कोणा कोणाची मदत झाली ? असा प्रश्न विचारला असता धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल करीत आपल्याला सर्वांनीच मदत केली असल्याचे सांगितले. घड्याळ घातलेल्या हातांनी आपल्याला सर्वात मोठी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसने सामान्य नगरसेवक, जिल्हा परिषद, सदस्य पंचायत समिती सभापती यांच्यावर नजर ठेवण्याऐवजी आपल्या पक्षात तोडपाणी करीत कोण फिरत होते. यावर नजर ठेवली असती, तर त्याचा फायदा झाला असता, असा टोलाही सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. धनंजय मुंडे बाबत आपल्याला कोणतीही टिप्पणी करावयाची नाही. त्यांचे नावही आपण घेतले नाही. मात्र ‘बाप बाप होता है’, अशा शब्दात धस यांनी प्रखर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.

काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही अशी ओरड राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू आहे. त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांची स्वतःची नवरी ऐनवेळी मंडपातून पळून गेली. त्यानंतर त्यांनी दुसरी नवरी तयार करावी लागली. मात्र त्यावेळी कोणालाही विश्वासात घेतले नाही. अशा शेलक्या शब्दात धस यांनी राष्ट्रवादीवर तीव्र शब्दांत टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपातून आणलेले रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीची पर्यायाने धनंजय मुंडे यांची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे बंडखोर असलेले अपक्ष उमेदवार जगदाळे यांना पाठिंबा देण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 7:08 pm

Web Title: bjp mlc suresh dhas slams on ncp and dhananjay munde after legislative council election
टॅग : Suresh Dhas
Next Stories
1 ‘बीड-उस्मानाबाद-लातूर’चा आज निकाल
2 सदाभाऊंची बैठक उधळण्याचा डाव; शेतकरी स्थानबद्ध
3 एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मराठवाडय़ात मोठा परिणाम
Just Now!
X