News Flash

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचाली

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी २ जानेवारी रोजी होणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेसोबत काँग्रेस सदस्यांवरही लक्ष

मिरजेचे आमदार सुरेश खाडे सुचवतील त्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीने घेतला आहे. सत्ता परिवर्तनासाठी महाविकास आघाडीचा डाव हाणून पाडण्यासाठी भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार आहे.  शिवसेनेची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याने या तीन सदस्यांना वगळून शिराळा तालुक्यातील काँग्रेसच्या दोन सदस्यांना गरहजर ठेवून बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी भाजपची आहे. आपल्या बाजूच्या सदस्याकडून फितुरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व सदस्यांना शुक्रवारी रात्री अज्ञात स्थळी रवाना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी २ जानेवारी रोजी होणार आहेत. या पार्शभूमीवर भाजपची सत्ता काढून घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे ३ सदस्य असून या सदस्यांचा कल अजूनतरी भाजपला अनुकूल आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून आदेश आला तर हे तीन सदस्य बदलू शकतात. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री पदाच्या शर्यतीत असून जर मंत्रिपद मिळाले नाही तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद तरी पदरात पडले अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

दरम्यान, भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली असली, तरी महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर सगळे संदर्भ बदलले आहेत. १ जागा रिक्त असल्याने ५९ पकी ३० सदस्य झाले तरी सत्ता कायम राहू शकते. भाजपचे सध्या पुरस्कृत दोन सदस्यांसह २६ सदस्यांचे संख्याबळ आहे. बहुमतासाठी आणखी ४ सदस्यांची गरज आहे. शिवसेनेचे ३ सदस्य जरी आघाडी सोबत गेले तर महाडिक, सी. बी. पाटील, नायकवडी गटाच्या रयत विकास आघाडीचे ४ सदस्य भाजपसोबत राहतील यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सत्ता परिवर्तन होणार नाही याची दक्षता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे घेत आहेत.

दरम्यान, अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी आरक्षण असल्याने या राखीव कोटय़ातील ५ सदस्य भाजपकडे असले तरी मिरज तालुक्याला संधी मिळायला हवी असा आग्रह धरला गेला. या आग्रहानुसार या नावाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आ. खाडे यांना देण्यात आले आहेत. ते ज्यांचे नाव निश्चित करतील त्यांना पुढील सव्वादोन वष्रे अध्यक्षपद मिळणार आहे.

अध्यक्षपदासाठी मिरज तालुक्यातील सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे या दोन महिलांची नावे आघाडीवर असून याबाबतचा निर्णय आ. खाडे ऐनवेळी जाहीर करणार आहेत. तथापि, श्रीमती कोरे यांनाच संधी मिळण्याची शक्यताही एका सदस्याने व्यक्त केली.

सदस्य एकत्र राहण्यासाठी प्रयत्न

भाजपचे सदस्य एकसंध राहावेत यासाठी पक्षीय पातळीवरून प्रयत्न सुरू असून सर्व सदस्यांना शुक्रवारी रात्री सहलीला रवाना करण्यात येणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. गोव्याला अथवा बेंगलोरला या सदस्यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप अंतिम निर्णय सांगण्यात आलेला  नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 2:29 am

Web Title: bjp moves for sangli zilla parishad president akp 94
Next Stories
1 सत्ता राखण्यासाठी जळगावमध्ये भाजपची कसरत
2 रेतीमाफियांकडून समुद्रकिनारे लक्ष्य
3 पालघरमध्ये महाविकास आघाडी?
Just Now!
X