प्रशांत देशमुख

वर्धा : आढावा बैठकीत पालकमंत्री सुनील केदार हे डावलत असल्याबद्दल भाजपाच्या खासदार आमदारांनी आज नारेबाजी करत निषेध नोंदवला.  पालकमंत्री सुनील केदार यांची जिल्हा परिषद सभागृहात करोना व अन्य विषयावर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण नसल्याबद्दल खासदार रामदास तडस तसेच भाजपाचे आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, जि.प. अध्यक्ष सारीका गाखरे यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून पालकमंत्र्याविरोधात नारेबाजी केली.

जिल्हा परिषदेच्या सभागृहातच बैठका घेतल्या जातात. मात्र जि.प. अध्यक्षांनाही बोलावले जात नाही. महा आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख तसेचे दादाजी भूसे, प्राजक्त तनपूरे यांच्या बैठकीत बोलावल्या जाते. केदार मात्र डावलतात, असा आरोप खा. तडस यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. सर्व सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवताना लोकप्रतिनिधींना विश्वाासात घेणे अपेक्षित आहे. केवळ सत्ताधारी पक्षाच्याच आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्षांना बोलावल्या जाते. करोनाच्या संकट काळातही आघाडीचे नेते राजकारण करीत आहे.

करोनाचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असून सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रातच झाले आहे. पण प्रशासन कुठेच दिसत नाही. सत्ताधाऱ्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना सर्वत्र दिसून येते. मंत्रालयात जावून प्रश्ना मार्गी लावणे सध्या शक्य नसल्याने पालकमंत्र्यांची आढावा सभाच प्रश्ना मांडण्याचे माध्यम ठरले आहे. तिथेही बोलावल्या जात नसेल तर प्रश्ना मांडायचे कुठे, असा सवाल भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी यावेळी केला. यावेळी झालेल्या नारेबाजीत जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे, पदाधिकारी मिलींद भेंडे, जयंत येरावार, अशोक कलोडे यांचा सहभाग होता.