‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने सोनी टीव्हीसोबत सूत्रसंचालन करणारे बिग बी अमिताभ बच्चन यांनाही टीकेचा सामना करावा लागत आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील याप्रकरणी संताप व्यक्त केला असून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.

“शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करणं हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता आणि महाराज यांचा एकेरी उल्लेख केला जातो, हे खपवून घेतले जाणार नाही,” असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसंच अमिताभ बच्चन यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

“शिवाजी महाराज यांचे नाव एकेरी घेतलं तर आम्ही काहीही करू शकतो,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला. तसंच राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर बोलताना महाराष्ट्रात सरकार लवकर स्थापन होत नाही याची खंत वाटते असं त्यांनी सांगितलं. महायुतीला बहुमत दिलं आहे त्याचा सन्मान व्हायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

सोनी टीव्हीने मागितली माफी
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अखेर सोनी वाहिनीने माफी मागितली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अनावधानाने आमच्याकडून एक चूक झाली. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत,” असं सोनी वाहिनेनं म्हटलं आहे. आम्ही चूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच टीव्हीवर यासंदर्भात माफी मागितली होती असं सोनी वाहिनीने स्पष्ट केलं आहे.

काय झालं होतं ?
६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या केबीसीच्या ११ व्या पर्वातील भागामध्ये एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर असताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले. यामध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. यावरुन सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा रंगली. ट्विटरवरही शुक्रवार सकाळपासूनच अनेकांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोनी वाहिनीवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. अनेकांनी हा हिंदू राजाचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हटलं होत. #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅग भारतामध्ये ट्विटवर नवव्या क्रमांकाला ट्रेण्ड होत होता. हा हॅशटॅग वापरून हजारो ट्विटस नेटकऱ्यांनी केल्यानंतर सोनी वाहिनीने सोशल नेटवर्किंगवरुन जाहीर माफी मागितली आहे.