खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरुणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे. युवकांनी आत्महत्या करू नयेत असं त्यांनी सांगितल असून तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? अशी विचारणाही केली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.

संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “विवेक रहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली”.

“मी मेल्यानंतर तरी…,” सुसाईड नोट लिहून मराठा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

“माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत,” असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.

“मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

बीडमधील केतूरा गावातील १८ वर्षीय विवेक रहाडे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चिठ्ठीत काय लिहिलं आहे ? 

मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल…