गडचिरोली
भाजपाचे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून फसवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला. खासदार अशोक नेते यांच्या नावाचा वापर करून बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून संपर्क साधत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करण्यात येत असल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात खासदार नेते यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे.
भाजपचे खासदार अशोक नेते हे सोशल मिडियावर सक्रीय नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन काही दिवसांपूर्वी अशोक नेते एमपी अशा नावाने नवीन फेसबुक अकाऊंट सुरू करण्यात आले. या अकाऊंटच्या माध्यमातून खासदार नेते हे सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे भासवण्यात आले. विशेष म्हणजे यामार्फत नागरिकांशी संपर्क साधून काही जणांकडून पैशांची मागणीदेखील करण्यात आली. सुरूवातीला हा प्रकार फारसा लक्षात आला नव्हता. पण खासदार नेते यांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत यासंबंधीची माहिती समजली. नेते यांना याची माहिती मिळताच त्यांनी या संदर्भात रीतसर तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात नोंदविली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेमुळे आसपासच्या परिसरात सध्या काही अंशी खळबळ माजली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 6:59 pm