23 January 2021

News Flash

पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे; भाजपा खा. गोपाळ शेट्टींचा राजीनाम्याचा इशारा

नाराज झालेल्या गोपाळ शेट्टींनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला असून मला पदापेक्षा वाणीस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असे शेट्टींनी म्हटले आहे.

गोपाळ शेट्टी (संग्रहित छायाचित्र)

भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे असून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. गोपाळ शेट्टी यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी केली आहे. ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या विधानामुळे खासदार गोपाळ शेट्टी यांना पक्षाच्या मुंबईतील नेत्यांनी झापल्याचे वृत्त असून यामुळे नाराज झालेल्या गोपाळ शेट्टींनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या विधानावर मी ठाम असून मला पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असे सांगत गोपाळ शेट्टींनी भाजपात आवाज दाबला जात असल्याचे संकेतच दिले. मी स्वतःच राजीनामा देण्यास तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गोपाळ शेट्टी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात ख्रिश्चनांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. ख्रिश्चन समाजाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नव्हता, असे त्यांनी म्हटले होते. गोपाळ शेट्टी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानेच असे विधान केल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली. भाजपाचे मुंबईतील अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेट्टी यांना हे वादग्रस्त विधान मागे घेण्यास सांगितले होते. शेट्टींचे ते वैयक्तिक मत असून भाजपा त्यांच्या मताशी सहमत नाही, आम्ही ख्रिश्चन समाजाचा आदर करतो, असे शेलार यांनी सांगितले होते. दुसरीकडे ख्रिश्चन समाजातील दोघांनी या प्रकरणी शेट्टींविरोधात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.

मुंबईतील पक्षनेतृत्वाने खडे बोल सुनावल्याने नाराज झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे. मला पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे असून मी माझ्या विधानांवर ठाम आहे. मी स्वत:च राजीनामा देण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

बोरिवली विधानसभा क्षेत्रात ‘मैदान-उद्यान सम्राट’ अशी ख्याती असलेले भाजपाचे गोपाळ शेट्टी हे २०१४ च्या निवडणुकीत लोकसभेत निवडून गेले. महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात सर्वाधिक मतदानही झाले होते. महापालिकेच्या १९९१ साली झालेल्या निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 12:50 pm

Web Title: bjp mp gopal shetty controversial statement on christian says ready to resign
Next Stories
1 सिडकोमधील जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
2 रायगडावरील मेघडंबरीतल्या वादग्रस्त फोटोप्रकरणी रितेशने मागितली माफी
3 दुसऱ्या लग्नासाठी पतीची ‘अशी ही बनवाबनवी’, एड्स झाल्याचा बनाव
Just Now!
X