राज्यात आणि केंद्रात असलेले भाजप सरकार आंधळे आणि बहिरे आहे असे म्हणत भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षावर टीका केली. माझ्यावर पक्षाला जी कारवाई करायची आहे ती करू देत, चुका झाल्यावर मी बोलणारच असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. सोमवारी पांचाळ समाजाच्या महाअधिवेशनासाठी नाना पटोले कोल्हापुरात आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरही नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी यांनी जाहीर केली मात्र सरकार कर्जबाजारी होत चालल्याचे ऐकले आहे. शेतकऱ्यांना बोगस ठरवणाऱ्यांनी गप्प बसलेलेच बरे असे म्हणत पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. एवढेच नाही तर सर्व सामान्य जनतेने भाजपला विश्वासाने मते दिली आणि बहुमताने निवडून दिले, मात्र भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेले आश्वासन सत्तेवर आल्यावर पाळले नाही. आश्वासने पाळली असती तर विविध प्रश्नांसाठी लोकांना मोर्चे काढावेच लागले नसते अशीही टीका पटोले यांनी केली.

राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील हेच समजत नाही अशी बोचरी टीकाही पटोले यांनी केली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी, ‘दारुच्या ब्रँडला महिलांची नावे द्या’ असे बेताल वक्तव्य केले होते. यावरही नाना पटोलेंनी टीका केली. गिरीश महाजनांसारख्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज द्यायला हवी असाही सल्ला पटोले यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत अशी टीका नाना पटोले यांनी उघडपणे केली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले. सप्टेंबर महिन्यात त्यांनी ही टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्री या ठिकाणी जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळेही राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.