सरसंघचालकांच्या वक्तव्यावरील टिप्पणी
सरसंघचालक मोहन भागवत यांनी बिहार निवडणुकीपूर्वी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर टिप्पणी करणे भाजपचे भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांना महागात पडले आहे. यासंदर्भात पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गेल्या २७ डिसेंबरला नागपुरात सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्ता परिषद पार पडली. त्यात इतर पक्षांतील ओबीसी नेत्यांसोबतच भाजपचे खासदार नाना पटोलेही सहभागी झाले होते. ओबीसींनी संघटित व्हावे, असे आवाहन करताना पटोले यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे उदाहरण दिले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याचा लालू आणि नितीश यांनी वेगळा अर्थ काढून मागासवर्गीयांची एकजूट घडवून आणली. त्यामुळे तेथे भाजपचा पराभव झाला, असे ते म्हणाले होते. पटोले यांच्या म्हणण्याचा दुसरा अर्थ हा सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे भाजपचा पराभव, असाच होतो व तसाच अर्थ घेऊन माध्यमांमध्ये या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाले. त्यामुळे भाजपात खळबळ उडाली. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनीही याची दखल घेतली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खासदार नाना पटोले यांनीही याला दुजोरा दिला आहे.
विशेष म्हणजे, बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर खुद्द सरसंघचालकांनीच त्यांच्या आरक्षणाच्या वक्तव्याबाबत जाहीरपणे खुलासा केला होता. त्यामुळे यावरील चर्चा तेथेच थांबलेली असताना खासदार पटोले यांना नोटीस पाठवून पक्षाने काय साध्य केले, अशी चर्चा आता भाजपच्या ओबीसी वर्तुळात सुरू झाली आहे. खासदार नाना पटोले हे भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पक्षातील प्रमुख ओबीसी चेहरा, अशीही त्यांची ओळख आहे.

नागपूरच्या ओबीसी कार्यकर्ता परिषदेतील माझे वक्तव्य ओबीसींनी संघटित व्हावे, या संदर्भातील होते. बिहार निवडणुकीचा संदर्भ हा त्यातूनच आलेला होता. मात्र, त्याचा विपर्यास करण्यात आला आहे.
नाना पटोले, खासदार