राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक ठिकाणी पिकासोबत मातीसुद्धा वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दौऱ्यावर असून पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मदतीचं आश्वासनही दिलं आहे. दरम्यान शेतकरी किती हतबल झाले आहेत हे दाखवणारा एक व्हिडीओ भाजपा खासदार संभाजीराजे यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत शेतकरी जगायचं तरी कसं अशी विचारणा करत आहेत.

संभाजीराजेंनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “तेरणा नदीने आपली वाट बदलली आहे. कर्नाटक सीमेलगत बोरसुरी गावच्या शिवारातून जवळपास दीड-दोन किमी चालत जाऊन या केटी बंधाऱ्यावर आम्ही पोहोचलो. पलीकडे सोनखेड गावचे शेतकरी वाहून गेलेल्या शेताकडे बघत बसलेले दिसले. आम्हाला जवळ आलेले बघून त्यांनी आर्त हाक दिली आणि व्यथा मांडायला सुरुवात केली”.

आणखी वाचा- शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, नुकसान भरपाई देण्यासाठी शासन खंबीर – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

“आमी आत्महत्या करायला तयार हाव…आवो काय, जगावं कसं बघा आम्ही?…पलीकडं उभ्या असलेल्या शेतकरी कुटुंबाचे शब्द ऐकले, अन माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला की काय असं वाटून गेलं. काय बोलावं हेच क्षणभर सुचेनासे झाले,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

“सगळ्या पिकाबरोबर मातीसुद्धा वाहून गेल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. आत्महत्या करू नका. मुख्यमंत्री, देशाचे कृषीमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांना भेटून तुमची व्यथा सांगून लवकरच मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला,” अशी माहिती संभाजीराजेंनी दिली आहे.

आणखी वाचा- पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही- शरद पवार

“नदीच्या काठावरच्या किंवा ओढ्याच्या काठावरच्या शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे लवकर करून घ्यावेत. माती वाहून गेलेल्या किंवा नदीचे बदललेले पात्र यावर विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे,” अशी विनंती संभीजाराजेंनी केली आहे.