लोकसभा निवडणुकीआधी भाजपात प्रवेश करण्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला खासदार सुजय विखे यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी विखेंवर टीका करताना सूर्य उगवतो विखे तिकडे जातात. त्यांना वाटलं सूर्य तिकडे उगवेल. मात्र. तो इकडेच उगवला असा टोला लगावला होता. यावर उत्तर देताना सुजय विखे यांनी सांगितलं आहे की, “भाजपामध्ये अनेकांनी प्रवेश केला. त्यामध्ये भाजपाची सत्ता येणार म्हणून काहींनी प्रवेश केला असा तर्क लावला जात आहे. पण आम्ही भाजपामध्ये गेलो कारण यांनी आम्हाला संधी दिली. हाच आमच्या आणि इतरांच्या प्रवेशातील मुख्य फरक आहे”.

सुजय विखे यांनी म्हटलं आहे की, “केंद्रात भाजपाची सत्ता येईल, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केलं होतं. जर आम्ही उगवत्या सुर्याकडे जाऊ नये असं त्यांना वाटत होतं तर त्यांनी आम्हाला लोकसभेच तिकीट द्यायला हवं होतं. आम्ही भाजपात गेलो नसतो”.

आणखी वाचा- “आमचा सूर्य योग्य ठिकाणी उगवला”, अजित पवारांच्या टीकेला सुजय विखेंचं उत्तर

“काँग्रेसमध्ये असताना आमच्यावर अन्याय झाला. सुडबुद्धीचं राजकारण करण्यात आलं. पण आम्हाला भाजपाने आधार दिला, जो आम्ही स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा-शिवसेना युतीला कौल दिल्याने आमचा निर्णय चुकला नाही हे सिद्ध झालं,” असं सुजय विखे यांनी सांगितलं आहे. दरम्यान यावेळी सुजय विखे यांनी कर्नाटक, मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही सत्तांतरण होईल असा दावा केला आहे.