News Flash

कुटुंब नियोजन केलं असतं तर लसींचा साठा कमी पडला नसता – उदयनराजे

"लॉकडाउन हा पर्याय नाही"

संग्रहित (एक्स्प्रेस फोटो - आशिष काळे)

व्यापाराच्या कडक निर्बंधामुळे व्यापाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यावर लॉकडाउन हा पर्याय नाही. करोनाचा व्हायरस शनिवारी, रविवारीच बाहेर येतो का? मी जर व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झालं असतं तरी मी दुकान उघडं ठेवलं असतं असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमवेत व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीस माजी सभापती सुनील काटकर, सुशांत निंबाळकर, राजेंद्र यादव तसंच सातारा व कराडातील व्यापारी उपस्थित होते. व्यापारावरील निर्बंध हा राज्य सरकारचा निर्णय आहे असे सांगून जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यास नकार दिला. बैठकीनंतर उदयनराजेंशी पत्रकारांनी संवाद साधला.

“व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असून कर्ज काढून व्यापाऱ्यांनी माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी मागे लागणार आहेत. त्यामुळे कामगारांच्या लसीकरणासाठी वयाची अट शिथिल करावी. हा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. मी मेडिकलचा विद्यार्थी नाही पण एक कॉमन सेन्स मलाही आहे. मी सायन्स शिकलेलो आहे,” असं उदयनराजे भोसले म्हणाले.

“वयाची मर्यादा कमी केली तर कामगारांनाही लस देता येईल. कामगारांना लस दिली तरीदेखील दुकाने उघडण्यास परवानगी दिली जात नाही, मग कोण ऐकणार. मी जर व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झालं असतं तरी मी दुकान उघडं ठेवलं असते. लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाउन हा पर्याय नाही,” असं सांगत उदयनराजेंनी विरोध दर्शवला.

शनिवार, रविवार बंद ठेवताय कशाकरिता? करोना व्हायरस शनिवार रविवारच बाहेर येतो का? असा प्रश्‍न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, “बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांपुढे आम्ही सर्व प्रश्‍न मांडले आहेत. हा आपल्या येथीलच नव्हे देशातील प्रश्‍न आहे. पोलीस यंत्रणाही किती दिवस लोकांना अडवणार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे”.

“पोलीस भरती होत नसल्याने त्यांची संख्या कमी आहे. परिणामी ते परिस्थिती हाताळू शकत नाही. चोऱ्यामाऱ्या वाढल्या तर कोण जबाबदार? महाराष्ट्र शासन की जिल्हा प्रशासन, असा उदयनराजेंनी विचारला.

पुढे ते म्हणाले, “माझ्याकडे खायला अन्न नाही. घरातील उपाशी मरत असतील मी दुसऱ्याच्या घरात घुसून अन्न नेले तर त्याला चोरी म्हणू शकाल का? घरातील लोकांना उपाशी मरताना मी बघायचे का? एवढे तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नाही. तुम्ही सरकारमध्ये सर्व तज्ञ लोक आहात. महाराष्ट्र राज्याची धुरा तुम्ही संभाळताय. आता संकट करोनाचे आहे, यापूर्वी अनेक संकटे आली. यामध्ये सार्स, एडस्‌चे होते, यावर कुठे लस तयार झाली. जिल्हाधिकारी म्हणतात दोन्ही प्रकारच्या लसी घेतल्या तरी करोना होणार नाही, असे सांगता येत नाही. याबाबत राज्याच्या सत्तेतील किंवा लोकप्रतिनिधीही ठरवू शकत नाहीत. केवळ शास्त्रज्ञच ठरवू शकतात”.

“मागे एकदा मास्क काढला. त्यावेळी हाच मास्क वापरा, तो चुकीचा आहे, असं सांगण्यात आले. याला जनता जबाबदार आहे का? एक, दोन दिवस लोक वाट पाहतील, मग कोण थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

आता व्यापाऱ्यांनी काय भूमिका घ्यायची, कोल्हापूरप्रमाणे होणार का, यावर उदयनराजे भडकले म्हणाले, “पण तुम्ही जिल्हे वेगवेगळे करू नका. तेथील परिस्थिती पहा ती सुध्दा माणसे आहेत. त्यांनाही वेदना आहेत. त्याच वेदनांना येथील लोकांनाही सामोरे जावे लागत आहे. कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे दक्षता घ्या. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो अशा माझ्या शुभेच्छा आहेत. जो जन्माला येतो त्या प्रत्येकाला एक दिवस जावेच लागते. तुम्ही काळजी घेऊन प्रतिकारशक्ती वाढवली तर तुम्ही बळी ठरणार नाही. यापूर्वी अनेक व्हायरसने माणसं मेली आहेत. माझ्या तब्येतीची मी काळजी घेतो, त्याप्रमाणे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे”.

करोना लसीच्या तुटवड्यावर उदयनराजे म्हणाले, “आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे .महाराष्ट्राला जास्त दिले आणि कुठल्या राज्याला कमी दिले जाते हा वाद निर्माण करू नका. महाराष्ट्राला जास्त कशाला मिळाले पाहिजे, प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे दिली पाहिजे. व्हायरस कोणत्या कालावधीत फिरतो कोणत्या कालावधीत झोपलेला असतो असे म्हणता येत नाही. प्रत्येकाने लस घ्यावी”.

प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली असती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच यापूर्वी पुरवठ्यासाठी मी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे सांगितले .भिडे गुरुजींच्या करोनाच्या वक्तव्याबाबत उदयनराजे म्हणाले, “माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलीन”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 1:10 pm

Web Title: bjp mp udyanraje bhosale coronavirus lockdown traders satara sgy 87
Next Stories
1 “…तर महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!”, टोला मारत रोहित पवारांची भाजपाला विनंती
2 “सध्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना एकच काम दिलंय…!” भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा सरकारवर निशाणा!
3 बीडच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
Just Now!
X