वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या प्रकल्पाचं खासदार उदयनराजे भोसले यांनी फित कापून प्रवेश करत उद्घाटन केले. या मार्गिका सातारकरांसाठी आजपासून खुला झाल्याची घोषणा करण्यात आली.

शहरातील पोवई नाक्‍यावरील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी येथे ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले होते. मागील पावणेतीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. ७६ कोटी रूपये खर्च झालेल्या या ग्रेड सेपरेटरच्या सर्व मार्गिकांची खासदार उदयनराजे भोसले आतून पाहणी करणार असल्याचे सातारा विकास आघाडीच्या सूत्रांनी सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दहा वाजता खासदार उदयनराजेंनी सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या लवाजमासह ग्रेड सेपरेटरच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर पोहोचले. तेथे त्यांनी फित कापली.

प्रत्यक्षात पाहणी करणार असताना उदयनराजे यांनी ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन करून सातारकरांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरची पाहणी केली. ग्रेड सेपरेटरच्या दुतर्फा उभे राहून सातारकरांनी हा सोहळा अनुभवला.

सातारा विकास आघाडीकडे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची मागणी सुरू झाल्याने उदयनराजे यांनी पाहणीचे नियोजन करण्याच्या निमित्ताने येऊन उद्घाटन केले. यावेळी सातारा विकास आघाडीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी पालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडी सक्रीय झाल्याचे व निवडणुकीचे एकतर्फी बिगुल वाजवल्याचे उदयनराजेंनी विरोधकांना दाखवून दिले.

ग्रेड सेपरेटरच्या संपूर्ण कामाचे श्रेय हे सातारकरांचे असल्याचे उदयनराजे यांनी नमूद केले . आपल्या २९ वर्षाच्या राजकीय वाटचालीत सातारकरांचा मोठा वाटा असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले, मला धक्का देण्याची सवय आहे, हे उद्घाटन तसेच धक्कातंत्र आहे .कधी मी धक्का देतो कधी मला धक्के खावे लागतात अशी मिश्किली त्यांनी केली.

ग्रेड सेपरेटर खुला कधी होणार या प्रश्नावर ग्रेड सेपरेटर खुला होणार अभी के अभी असा जोरदार डायलॉग उदयनराजे मारल्यावर राजे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ग्रेड सेपरेटरचे काम साठ कोटी रुपयांचे होते. मात्र, गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी निधी लागल्याने संपूर्ण काम ७६ कोटींवर गेले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली.

ग्रेड सेपरेटरच्या संपूर्ण कामाचे श्रेय उदयनराजेंना जाते. फित कापून त्यांनी या मार्गfकेचे उद्घाटन केले . उद्घाटनाला उदयनराजे, नगराध्यक्षा व सातारा विकास आघाडीचे सदस्यच उपस्थित होते, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी आदी कोणीही उपस्थित नव्हते. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले.