यवतमाळ : केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी १२ ऑगस्टला येथील प्रेमासाई दरबार  महाराज यांची येथे भेट घेतली होती. त्यानंतर १५ ऑगस्टला त्यांचे पुत्र खासदार वरुण गांधी यांनीदेखील यवतमाळात येऊन प्रेमासाईंचे  आशीर्वाद घेतले.

यवतमाळातही  फारसे माहिती  नसलेले २७ वर्षीय प्रेमासाई हे मेनका गांधींनी घेतलेल्या भेटीमुळे  अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रेमासाईंना बघायला त्यांच्या निवासस्थानी गर्दी होत असताना ते मेनका गांधींसोबत मुंबईला निघून गेले  होते.  १४ ऑगस्टला ते यवतमाळात परत  आले. आई पाठोपाठ वरुण गांधीही यवतमाळात पोहोचले व त्यांनी प्रेमासाई यांचे दर्शन घेतले. मेनका  गांधी यांच्याप्रमाणेच वरुण गांधी यांचाही  दौरा कमालीचा गुप्त ठेवण्यात आला होता. वरुण गांधी यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याची  भेट घेतली  नाही. प्रेमासाई यांच्या यवतमाळातील निवास्थासमोरील अंगणात  वरुण गांधी यांनी  रुद्राक्षाचे  रोपटे लावले.

ना  संघ, ना भाजप

प्रेमासाईंचे दर्शन घेण्यासाठी शनिवार दिनांक १२ ऑगस्टला  येथे आलेल्या  केंद्रीय  मंत्री मेनका  गांधी यांनी राष्ट्रीय  स्वयंसेवक  संघाच्या  येथील कार्यालयात  भेट दिली होती. मात्र, वरुण  गांधी ना संघ  कार्यालयात गेले ना  कुण्या भाजप नेत्यांना भेटले. दिल्लीहूून विमानाने  नागपूरला  आणि नागपूरहून कारने ते यवतमाळला आले.  प्रेमासाईंचे  दर्शन  घेऊन आले तसेच परत गेले.

निवडणूक लढण्याची  विनंती नाकारली

या भेटीत वरुण यांनी प्रेमासाई यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा  मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढण्याची  विनंती केली,  मात्र प्रेमासाईंनी ती प्रेमपूर्वक नाकारली. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ हे  देखील आध्यात्मिक  गुरू आहेत, परंतु ते  राजकारणात सक्रिय  असल्याचे उदाहरण वरुण  गांधी यांनी दिले.  तेव्हा आपल्या आध्यात्मिक कार्यात त्यामुळे खंड पडेल, असे प्रेमासाई यांनी वरुण यांना सांगितले.