नागरिकत्व नोंदणी व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अक्कलकोट येथे संघ परिवार व समविचारी संघटनांनी काढलेल्या जागृती फेरीत सहभागी झालेले सोलापूरचे भाजपचे खासदार  तथा वीरशैव लिंगायत समाजाच्या गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी शिवाचार्य यांना अचानक भोवळ आली. त्यांना अक्कलकोटच्या स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर सोलापुरातील रुग्णालयात हलविण्यात आले. सायंकाळ नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) व नागरिकत्व सुधारणा (सीएए) हे दोन्ही कायदे केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केले आहेत. परंतु या दोन्ही कायद्यांमुळे देशाची एकता व अखंडता धोक्यात येण्याचा धोका असल्यामुळे आणि त्यातून यापूर्वीच्या ‘नोटाबंदी’प्रमाणेच गोंधळ उडण्याची भीती असल्याने या दोन्ही कायद्यांना देशभरात तीव्र विरोध होत आहे. या पाश्र्वभूमीवर हे दोन्ही कायदे देशहिताचे कसे आहेत, हे जनतेला पटवून देण्यासाठी संघ परिवाराने देशभर जनजागृती हाती घेतली आहे. त्यानुसार अक्कलकोट शहरात संघ परिवार व समविचारी संघटनांनी शनिवारी दुपारी जनजागृती फेरी काढली होती. ही जनजागृती फेरी श्रीमंत कमलाराजे भोसले चौकातील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवनापासून निघाली.

जनजागृती फेरीत खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी शिवाचार्य व अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह वीरशैव मठाचे श्रीकंठ शिवाचार्य (नागणसूप), नीलकंठेश्वर शिवाचार्य (मैंदर्गी), दुधनीचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरूलिंगप्पा येळमेली, तालुका कार्यवाह संतोष वगाले, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.

विविध मार्गावरून चालत ही फेरी पुन्हा प्रियदर्शनी सांस्कृतिक भवनाजवळ येऊन समाप्त झाली. त्या वेळी झालेल्या सभेत भाषण करताना खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी शिवाचार्य, आमदार सचिन कल्याणशेट्टी व श्रीकंठ महास्वामीजी यांची भाषणे झाली. भाषण करून व्यासपीठावरून खाली उतरताना खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांना अचानक भोवळ आली. त्यांचा तोल गेला. तेव्हा तातडीने त्यांना अक्कलकोटच्या खासगी दवाखान्यात उपचार करून सोलापुरातील एका रुग्णालयात हलविण्यात आले.