“चाळीस वर्षांहून अधिक काळ तळमळीने जनतेची कामे करणारा जनप्रतिनिधी म्हणून प्रभावी कारकीर्द असलेल्या सरदार तारासिंह यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टी मुंबईचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान झाले आहे”, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी दु:ख व्यक्त केले. सरदार तारासिंह यांच्या आठवणी जागवताना नाईक म्हणाले, ‘‘खरं तर तारासिंह यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. तारासिंह यांनी मात्र जनसेवेसाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी उत्तर पूर्व जिल्ह्याचे ते अध्यक्षही होते. आज पार्टीच्या आदर्श जनप्रतिनिधींमध्ये त्यांची गणना होते. मी भारतीय जनता पार्टी मुंबईचा अध्यक्ष असताना तारासिंह यांनी पहिली निवडणूक जिंकली. आपल्या मतदार संघासाठी तळमळीने काम करणारे सरदार तारासिंह दीर्घकाळ नगरसेवक व आमदार होते. जनतेला सहज उपलब्ध असलेला जनप्रतिनिधी म्हणून ते ओळखले जात. सरदार तारासिंह यांना माझी विनम्र श्रद्धांजली”, अशा भावना राम नाईक यांनी शोकसंदेशातून व्यक्त केल्या.

सरदार तारासिंग

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शोक व्यक्त केला. “सरदार तारासिंह हे भाजपाचे समर्पित नेते होते. ते सेवाभावी वृत्तीचे होते. १९८४ ते १९९९ या काळात ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. तर १९९९ ते २०१९ या काळात ते चार वेळा विधानसभेचे आमदार झाले. लोकप्रतिनिधी म्हणून आणि भाजपाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सदैव समाजाच्या सेवेला वाहून घेतले होते. मुलुंड परिसरात त्यांनी रस्ते, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, उद्याने, बस थांबे अशा विविध सुविधा पुढाकार घेऊन निर्माण केल्या. त्यांनी गरीबांसाठी रोजचे अन्नछत्र चालविले होते. तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब नांदेड गुरुद्वाराचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कार्य केले होते. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात पक्ष सहभागी आहे”, असे पाटील म्हणाले.