News Flash

नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत खळबळ; म्हणाले…

प्रदेशाध्यक्ष स्वीकारण्यापूर्वीच स्बबळावर सत्तेत येण्याची भूमिका

काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड अंतिम मानली जात आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्याने त्यांच्यावरी भार कमी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या नेत्याकडे सोपवलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेतही दिले होते. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबत त्यांनी सूचक विधानही केलं आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. सरकार भक्कम असून पुढील निवडणुकांमध्येही तिन्ही पक्ष एकत्र असतील असं वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत कसा येईल असं सांगत सूचक विधान केलं आहे.

राजीनाम्याच्या चर्चेवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन, म्हणाले…

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, “आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल”.

लवकरच नव्या भूमिकेत : पटोले

दरम्यान गुरुवारी नाना पटोले पाडळे लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी लवकरच मला नवी भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर असेपर्यंत नागरिकांची काही कामे तातडीने करणार आहे, असे सूचक वक्तव्य केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यावर पहिल्यांदाच पटोले यांनी प्रतिक्रिया देऊन प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 2:59 pm

Web Title: bjp nana patole on mahavikas aghadi state president sgy 87
Next Stories
1 वाई न्यायालयाकडून उदयनराजेंची निर्दोष सुटका
2 अखेर ‘संभाजी बिडी’चं नाव बदललं, आता ‘या’ नावाने होणार विक्री
3 जयंत पाटलांच्या ‘मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं’वर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Just Now!
X