01 March 2021

News Flash

धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का?; नारायण राणे संतापले

"पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील"

नव्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकार आक्रमक झालं असून मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मोदींनी नवे कृषी कायदे आणले आहेत. हे राजकीय आंदोलन आहे. हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देणार बोलले होते. त्याचं काय झालं? किमान १० हजार तरी द्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचं तसंच न्याय देण्याचं कोणतंही काम सध्याचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही,” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

कृषी कायद्यांविरोधात शरद पवार आक्रमक; शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय

“सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बेस्टचंही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

“हे राजकीय आंदोलन असून राजकीय खेळी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचं एकही काम या सरकारने केलेलं नाही, आता पुळका आला आहे. ते बिल शरद पवारांनी आता वाचलं असेल, यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचं आहे का ? मग विरोध कशाला? धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी यावेळी केली.

“नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा केला असून शेतकरी खूश आहेत. फक्त राजकीयदृष्ट्या भाजपाच्या विरोधातील लोक एकत्र आले आहेत. भाजपाला जे यश मिळत आहे ते पाहवत नाही म्हणून पोटदुखीमुळे आंदोलन सुरु आहे,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

ग्रामपंचायत निवडणुकीत सगळे पक्ष आपण पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करत आहेत. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “भाजपाचा दावा खरा असतो आणि आहे. भाजपा जी माहिती देतं ती खरी असते. आम्हाला त्यासाठी हेराफेरी करण्याची गरज नाही. आमचे सदस्य फिरवण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही. तसं केल तर परिणाम गंभीर होतील”.

औरंगाबादच्या नामकरणावर बोलताना ते म्हणाले की, “बाळासाहेब वरुन पाहत असतील तर अशा पुत्राला काय म्हणत असतील. औरंगाबादमध्ये संभाजीनगर म्हणून बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं. मुलगा मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही हे दुर्दैव आहे. साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रीपद मोठं वाटतं. एक तर लाचारी करुन पद मिळवलं, त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. औरंगाबादचं संभाजीनगर जाहीर करायचं सोडून टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत. ही शिवसेना नाही. आम्ही होतो ती वेगळी आणि आत्ताची शिवसेना वेगळी आहे”.

“मुख्यमंत्री जरी असले तरी सरकारी यंत्रणा हाताळण्याचं ज्ञान, अभ्यास नाही. गाडी चालवायची माहिती असेल पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही. त्यामुळे सरकार पुढे जात नाही. सरकारच्या अपयशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत,” अशी टीका नारायण राणे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 3:26 pm

Web Title: bjp narayan rane farm laws narendra modi mahavikas aghadi sgy 87
Next Stories
1 भंडारा आग प्रकरणाबद्दल आरोग्य मंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले…
2 राज्य सरकारची कृती सगळ्याच आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी; फडणवीस यांचा आरोप
3 “हे’ तर ठाकरे सरकारचं तुघलकी फर्मान”
Just Now!
X