ज्यांना जिथे बसण्याचा प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला आहे तो प्रोटोकॉल भाजपा सरकार पाळत नाही ही सत्य परिस्थिती आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मोदी सरकारच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेचा पास देण्यात आला होता. त्यामुळे शरद पवार या शपथविधीला गेले नाहीत अशी चर्चा रंगली असून यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली.

‘कालच्या शपथविधीला पवारसाहेब गेले नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. परंतु सरकारची जबाबदारी आहे की, प्रत्येक महत्वाच्या नेत्याचा जो प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे जागा दिली पाहिजे. शपथविधीला ८ हजार लोकांना बोलवले होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण आपल्या देशात लोकशाही असून शरद पवार हे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसंच माजी ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा प्रोटोकॉल आहे’, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान ?

या देशातील मुकेश अंबानी, अदानी, सिने अभिनेते यांना प्रोटोकॉल लागू होत नाही. परंतु भाजपा सरकारला यामध्ये कोण प्रमुख वाटतं. अंबानी, अदानी यांना पुढे बसवायचं आहे की, या देशात ज्यांना अधिकार आहेत त्यांना अशा संतप्त सवालही नवाब मलिक यांनी सरकारला केला.

हे सर्व जे घडलंय ते जाणुनबुजून घडवलंय की चूक झाली आहे. जर चूक झाली असेल तर त्यात सुधारणा करायला हवी होती. परंतु ती करण्यात आली नाही, त्यामुळे कोणावर कारवाई करणार हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.