मंत्री पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण विभागाने एकाच दिवशी २०० कोटींच्या चिक्की व इतर साहित्य खरेदी केल्याच्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने परळी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे मुंडे यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा आरोप करीत केज येथे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करून संताप व्यक्त केला. भाजप आमदार आर. टी. देशमुख, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पत्रके काढून मुंडेंची बदनामी थांबवा अन्यथा मुंडे समर्थक रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला.
परळीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. गोिवद फड, शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी शुक्रवारी सकाळी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. खरेदी प्रकरणात मुंडे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजप कार्यकर्त्यांनी केज येथे शिवाजी चौकात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर मुंडे यांच्या बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा आरोप करीत या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करून संताप व्यक्त केला. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील गलांडे, रमाकांत मुंडे, मुरलीधर ढाकणे या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, चिक्की खरेदी प्रकरणावरून मुंडेंच्या विरोधात व समर्थनार्थ राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकत्रे रस्त्यावर उतरल्याने बीड जिल्ह्य़ातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुंडे यांची बदनामी थांबवा अन्यथा भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून दोन्ही काँग्रेसला जशास तसे उत्तर देईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिला.