औरंगाबाद :  ‘वन बूथ १० युथ’ हा संकल्प घेऊन भाजपानं लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा कामाला लावली. देशभर एकहाती सत्ता मिळवली. निवडणुकीतील यशानंतर भारतीय जनता पार्टीची झपाट्यानं वाढ झाली. त्यामुळे आता ‘वन बूथ २५ युथ’ हे लक्ष्य समोर ठेऊन पक्षाचं काम सुरू आहे. मुंबई इथं होणाऱ्या महामेळाव्यासाठी त्या पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे. पक्ष स्थापना दिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या या मेळाव्याला मराठवाड्यातून सव्वा लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील असं भाजपाकडून सांगण्यात आलं. त्यासाठी मराठवाड्यातून ११ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. बस आणि खासगी वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यखातेखाली हा महामेळावा होणार आहे. मुंबईतील बिकेसी मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई राज्याचं केंद्रस्थान असल्यानं भाजपकडून हा मेळावा मुंबईत घेण्यात येत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपलं जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. युवा मोर्चा, महिला आघाडी, कामगार सेल, अशा विविध गटातील कार्यकर्ते मेळाव्याला येणार असल्याचे भाजपाकडून आज सांगण्यात आलं.

भारतीय जनता पार्टी राज्यात देखील एक नंबरचा पक्ष आहे. पक्षाची महाराष्ट्र स्थरावर एक कोटी प्राथमिक सदस्यसंख्या आहे. त्यामुळे ‘वन बूथ २५ युथ’ या प्रमाणे मेळाव्यासाठी काम सुरु आहे. त्यासाठी जिल्हानिहाय आढावा मेळावे घेण्यात आले आहेत. राज्यात ९२ हजार बुथ आहेत. त्यापैकी ८३ हजार कार्यरत केले असल्याचं पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर घेण्यात येत असलेल्या या ‘महामेळाव्यात’ भारतीय जनता पार्टीकडून काय रणनीती ठरवली जाईल ? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.