भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर गोपीचंद पडळकर यांचं तोंड काळं करण्याची धमकी दिली आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. भाजपाच्या आमदार किंवा कार्यकर्त्याला हात जरी लागला तरी आम्ही जशास तसे उत्तर देवू असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत.. पडळकरांच्या त्या वक्तव्याचं समर्थन मी करत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा…जशास तसे उत्तर देऊ”.

आणखी वाचा- पडळकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाची ‘मन की बात’ तर नाही ना?; शिवसेनेचा टोला

दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादीवाल्यांकडून मारु, काळं फासू अशा धमक्या येत आहेत. आता काय त्यांच्याकडे गृहखाते आहे म्हणून मस्ती आहे. पण भाजपाच्या आमदार किंवा कार्यकर्त्याला हात जरी लागला तरी आम्ही जशास तसं उत्तर देऊ. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आमचा आहे हे लक्षात ठेवा”.

आणखी वाचा- “शब्द चुकले असले तरी…,” चंद्रकांत पाटील यांनी मांडली गोपीचंद पडळकरांची बाजू

दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माझ्याबद्दल कोणीही काही बोलतं, फडणवीस यांना टोपण नावं ठेवतात? असं म्हटलं होतं. “गोपीचंद पडळकर एक समजूतदार कार्यकर्ता आहेत. त्यांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. इतक्या जुन्या प्रकरणावर पत्रकारांना प्रश्न विचारण्याची तशी गरज नव्हती. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिलं नाही असा अनुभव त्यांना आला असेल म्हणूनच त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. शरद पवारांचा अनादर व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. फडणवीस यांनी पडळकर यांना शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

आणखी वाचा- गोपीचंद पडळकरांना साताऱ्यात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा इशारा

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतो. आम्हाला कसलीही टोपण नावं ठेवली जातात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामे जरूर केली. परंतु तुम्ही अग्रलेखामध्ये काय लिहिता? त्यातली तुमची भाषा कसली आहे?,” असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर शरसंधान केले. “राजकारणात निश्चितपणे शब्द जपून वापरले पाहिजेत. अन्यथा त्याची जखम खूप दिवस राहते. गोपीचंद पडळकर चुकला म्हणून इतरांनी काहीही बोलू नये. कोणी काहीही बोलले तरी चालते का ? असा सवाल करत त्यांनी सर्वांनीच राजकीय संस्कृतीचे जतन करायला हवे,” असा सल्लाही दिला.