अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. परदेशातील राजकीय नेते भारतातील राजकीय नेत्यांबाबात अशा पद्धतीचं मत जाहीर करु शकत नाही असं संजय राऊत यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे? अशी विचारणाही संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.

शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांना झोप लागत नसेल असा टोला निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. “शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामांना झोप लागत नसेल. आता ओबामांचं कसं होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामांचं आता काही खरं नाही,” असं उपहासात्मक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

बराक ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे. “परदेशातील राजकारणी भारतातील राजकीय नेत्यांबद्दल अशी मते व्यक्त करु शकत नाहीत. ‘ट्रम्प वेडे आहेत’ असे आपण म्हणत नाही. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

काय म्हटलं आहे पुस्तकात
“राहुल गांधी हे एक विद्यार्थी आहेत ज्यानं अभ्यासक्रम पूर्ण तर केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत. परंतु त्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्यांच्यात ती आग नाही,” असं ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्राचा आढावा घेतला आहे. यामध्ये बराक ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या आढाव्यानुसार ओबामा राहुल गांधींबद्दल म्हणतात की, “राहुल गांधी यांच्यात एका घाबरलेल्या विद्यार्थ्याचे गुण आहे. ज्या विद्यार्थ्यानं आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याला आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचं आहे. परंतु त्याच्याकडे त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा त्याच्याकडे प्राविण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही.”