५३ वर्षांची जुनी सोलापूर महापालिका काँग्रेसच्या ताब्यातून काढून सोलापूरकरांनी मोठय़ा विश्वासाने भाजपच्या हाती सोपवून १० महिन्यांचा काळ लोटला आहे.  गेल्या १० महिन्यांचा महापालिकेतील सत्ताकाळ पाहिला तर भाजपला सत्ता चालविणे आणि गाजविणे, पर्यायाने नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरणे हे काही जमता जमेना, अशीच अवस्था आजही कायम आहे. दोन्ही मंत्री देशमुखांच्या गटातील पदोपदी उफाळणारा संघर्ष पक्षाला चांगलाच डोकेदुखीचा ठरला आहे. त्याकडे प्रदेश पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधूनसुद्धा अपेक्षित परिणाम न होता पक्षातील हे गटबाजीचे ग्रहण अद्यापि सुटले नाही.

काँग्रेसचे बलाढय़ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या गडाला जोरदार धक्का देत सोलापूर महापालिकेची सत्ता भाजपने खेचून आणली. स्पष्ट बहुमतासाठी ५२ नगरसेवकांची संख्या अपेक्षित असताना भाजपकडे नगरसेवकांची संख्या ४९ एवढी आहे. स्पष्ट बहुमतासाठी चार नगरसेवकांना आपल्याकडे वळवून घेणे व निकोप सत्ता चालविणे भाजपला गेल्या १० महिन्यांत तर जमलेच नाही, उलट आहेत त्या नगरसेवकांना एकसंधपणे बांधून न ठेवता दोन मंत्री देशमुखांच्या गटात ४९ नगरसेवक विभागले गेल्याने सत्ताधारी म्हणून भाजपची होत असलेली पंचाईत आजही कायम आहे. असे असूनही महापालिकेच्या कारभाराची सगळी जबाबदारी भाजपच आहे. अल्पमतातील सत्ता ही अडचण नाही, तर सत्तेची जबाबदारी पेलताना उद्भवणारे पक्षांतर्गत वाद, क्रिया-प्रतिक्रिया, शह-काटशहाचे उघडपणे होणारे राजकारण यामुळे कारभाराचा गाडा तर रुतला आहेच, शिवाय इतरापेक्षा वेगळा पक्ष म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपची पदोपदी नाचक्की होताना दिसते आहे. भाजपच्या सोलापुरातील दोन्ही मंत्री देशमुखांतील प्रतिष्ठेचा मुद्दा आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेल्या वाद व भांडणातून महापालिकेला वाईट भोग भोगावे लागत आहेत.

महापालिकेत सत्ता काबीज केल्याच्या क्षणापासून भाजपला गटबाजीचे ग्रहण लागले आहेत. महापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीपासून ते अर्थसंकल्प मांडून ते मंजूर घेण्यापर्यंत प्रारंभीच्या काळात सत्ताधारी म्हणून भाजपचे झालेले हसे सोलापूरकरांनी पाहिले होते. नंतर सुधारणा होईल आणि कारभार रुळावर येईल, अशी अपेक्षा सारे जण बाळगून होते. परंतु त्यावर आतापर्यंत पाणीच फेरले जात असून भाजपच्या हाती महापालिकेचा गाडा सोपवून एका अर्थाने सोलापूरकरांना पश्चाताप होताना दिसून येते. कारण पक्षातील गटबाजीला पायबंद आजअखेरही बसला नाही.

पालकमंत्र्यांना महापौरांची धास्ती ?

भाजपअंतर्गत वाढत्या गटबाजीमुळे सोलापूरवासीयांमध्ये पक्षाची प्रतिमा डागाळत चालली असताना त्यावर महापौर शोभा बनशेट्टी यांनीही पक्षांतर्गत वादाचे कोडे उलगडताना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आपली धास्ती घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशमुख व बनशेट्टी दोघेही लिंगायत समाजाचे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून उभे राहण्यासाठी महापौर बनशेट्टी इच्छुक आहेत. तसे विधान त्यांनी अलीकडेच केले होते. त्याचाच संदर्भ देताना बनशेट्टी यांनी पालकमंत्री देशमुख हे आपली धास्ती घेत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतात.

सोलापूरचे नुकसान

सत्ताधारी भाजपमधील वाद गेले नऊ-दहा महिने सुरूच आहे. नव्हे तो विकोपाला गेला आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे कोण कोणाला जुमानत नाहीत. दोन्ही मंत्री देशमुखांतील वाद मिटत नसल्याने त्याचा फटका सोलापूरच्या विकासाला बसत आहे. झाले आहे. यापुढे भाजपला सोलापूरकर कदापि माप करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा पालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी व्यक्त केली आहे.