केंद्रीय मंत्रिमंडळात खातेवाटपावरुन शिवसेना नाराज असतानाच राज्यात मात्र भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवली आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे सूत्रांकडून समजते. या पदावर संधी कोणाला द्यायची, असा पेच निर्माण होईल आणि यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची भीती शिवसेनेला वाटत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यात अखेर भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवली आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहेत. मात्र, शिवसेना पक्षनेतृत्वाला उपमुख्यमंत्रीपद नकोय, असे भाजपामधील सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

शिवसेनेत उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिवसेना पक्षनेतृत्वाने उपमुख्यमंत्रीपदाऐवजी आणखी दोन मंत्रीपद मागितले आहेत. या दोन जागांसाठी राष्ट्रवादीतून आलेले जयदत्त क्षीरसागर आणि आणि आमदार तानाजी सावंत या दोघांची नावे चर्चेत आहे.
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये अद्याप मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झालेली नाही. याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असे एका नेत्याने स्पष्ट केले.

शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्रीपद अडीच- अडीच वर्ष वाटून घेण्याची शिवसेनेची तयारी आहे. शिवसेना युतीत असली तरी राज्यात मुख्यमंत्रीपद भाजपाकडेच असणार, असे भाजपाचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत विधानसभा निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाईल, तुर्तास आम्ही शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहोत, असे भाजपामधील एका नेत्याने सांगितले.

शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते मागितले असून लोकसभेचे उपाध्यक्षपदावरही शिवसेनेने दावा केला आहे. शिवसेनेच्या या मागणीबाबत भाजपाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. केंद्राऐवजी राज्यात शिवसेनेला मानाचे स्थान देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाने केल्याचे दिसते.