महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाची साथ सोडून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे एक वजनदार नेते होते. भाजपाचा राज्यामध्ये विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्य सरकारमध्ये मंत्री, विरोधी पक्ष नेतेपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या.

२०१४ मध्ये राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच खडसे नाराज होते. मागच्या काही वर्षांपासून ते भाजपाच्या सक्रीय राजकारणातून बाजूला पडले होते. आपल्यावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना होती. आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास

– जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोठाडी गावात दोन सप्टेंबर १९५२ रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला.

– एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली. ग्राम पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

– त्यानंतर १९८७ साली ते कोठाडी गावचे सरपंच झाले.

– १९८९ साली भाजपाच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.

– १९८० साली भाजपामधून त्यांनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओबीसी नेते म्हणून त्यांनी स्वत:ची प्रतिमा तयार केली.

– महाराष्ट्रात १९९५ साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थ-सिंचन ही खाती संभाळली.

– नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोंबर २०१४ या काळात ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. प्रभावी वकृत्व आणि मुद्देसूद विषय मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे.

– पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी तीन जून २०१६ रोजी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

– २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. खडसेंऐवजी भाजपाने त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना तिकिट दिले. शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव केला.

– २०१९ पर्यंत सलग सहावेळा एकनाथ खडसे यांनी मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली.