28 February 2020

News Flash

पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बूट, फोटो व्हायरल

पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं

पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या उपोषणासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाषण करत राज्य सरकारवर टीकादेखील केली. दरम्यान व्यासपीठावरील देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो चर्चेत असून व्हायरल झाला आहे. या फोटोत देवेंद्र फडणवीस हातात बूट घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत टीका केली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं वाटत असेल, म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले असा टोला लगावला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली आहे.

काय लिहिलं आहे फेसबुक पोस्टमध्ये –
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणून सांगत होतात. प्रत्येक भाषणात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, हे ढोल बडवत सांगत होतात. चक्क आपण आज आंदोलनात सहभागी झालात. आपल्याच लोकांवर विश्वास नाही. चोरांच्या टोळीत बसलोय की काय, असा विश्वास वाटत असेल म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले. विरोधात आहेत मान्य आहे, पण महाविकासआघाडी सत्तेत येऊन महिनाच झाला आहे. पाच वर्षातील तुमच्या सत्तेतील हिशोब द्या”

मराठवाडय़ातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जावी
मराठवाडय़ातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी म्हणून भाजप व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींनी सहभाग नोंदवला.

जलयुक्त शिवार योजना कायमस्वरुपी सुरू ठेवावी, वॉटर ग्रीड योजनेला चालना द्यावी तसेच समुद्रात वाहून जाणारे पाणी विविध नद्याजोड प्रकल्पातून मराठवाडय़ास उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन भाजपच्यावतीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना उपोषणानंतर सुपूर्द करण्यात आले. सकाळी ११च्या सुमारास पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास सुरुवात झाली. भाजपच्या बहुतांश नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली. पाणी विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही या उपोषणाला पाठिंबा दिला. या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हे उपोषण सरकारवर टीका करण्यासाठी किंवा आक्षेप घेण्यासाठी नाही, तर सरकारला वेळीच जाग आणण्यासाठीचे आहे. संवेदनशील मुख्यमंत्री या आंदोलनाची दखल घेतील. मराठवाडय़ाच्या मागासपणाचा प्रश्न पाण्याशी संबंधित आहे. तो सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

First Published on January 28, 2020 10:50 am

Web Title: bjp pankaja munde devendra fadanvis aurangabad protest sgy 87
Next Stories
1 सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का? इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना सवाल
2 “खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय”
3 राज्यात ‘सीएए’विरोधात ठराव होणं शक्य नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण
Just Now!
X