महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत वाद अधिक तीव्र झाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला, तर पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. या साऱ्यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याकडे… गोपीनाथ गडावरील मेळाव्यात त्या कोणती वाट निवडणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्याबाबत पंकजा मुंडे यांनी स्वत: ‘इतके दिवस थांबला आहात, तर आणखी एक दिवस थांबा’ असे सूचक उत्तर दिले आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या (१२ डिसेंबर) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे, पण महत्त्वाचे म्हणजे या मेळाव्याच्या पोस्टरवरून कमळ हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे.

गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला अवघा एक दिवस उरला आहे. त्यामुळे संपूर्ण परळीत मेळाव्याचे पोस्टर लावणे सुरु झाले आहे. या मेळाव्याच्या पोस्टरवरून भाजपा आणि कमळ गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपाचे नाव किंवा कमळाचे चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेदेखील अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे नक्की कोणती वाट निवडणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.