पंकजा मुंडे यांनी भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे सांगत बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर करत पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं.  दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमत्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी समर्थकांशी संवाद साधत जोरदार भाषण केलं. गोपीनाथ मुंडेंचा प्रवास मृत्यूनंतरही कायम आहे ही किमया आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. सामान्य माणसाचा, वंचितांचा नेता म्हणू त्यांच्याकडे आजही आदराने पाहिलं जातं असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- पक्ष कुणाच्याही मालकीचा नसतो हे लक्षात असू द्या!- पंकजा मुंडे

“शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते. आणि मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही,” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. “पक्ष कोणाचाच नसतो. स्वत: नरेंद्र मोदीदेखील मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगतात असं सांगताना बेईमानी आमच्या रक्तात नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. हा पक्ष माझ्या बापाचा आहे सांगत पंकजा मुंडे यांनी आपण अद्यापही पक्षात राहणार असल्याचं जाहीर केलं.

“पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली याचा शोध घ्यावा तसंच कोअर कमिटीमधून मला मुक्त करावं,” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितलं. “मी पक्ष सोडणार की नाही याचं उत्तर पक्षानं द्यावं. ते दिलं तरी लोकांच्या मनात शंका आहे. पंकजा मुंडे दबाब आणत असल्याचं काहीजण म्हणत आहेत,” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “स्वर्गात सुद्धा श्री नसेल तर राजालाही काही अर्थ नसतो. लक्ष्मी नसेल तर समुद्र मंथन करुन बाहेर काढावं लागतं. लक्ष्मी हरवली आमची. तोंडचा घास आम्हाला घेता आला नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं असं वाटत होतं. पण आता मी काम करणार,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

आणखी वाचा- मी निवडणुकीत कशी पडले हे पुस्तक लिहिन तेव्हा कळेल : पंकजा मुंडे

“मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात. मी राज्यभर दौरा करणार. मी वज्रमूठ खरणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केलं.

गेले १२ दिवस टीव्ही लावला तर रोज संजय राऊत दिसायचे. ते जे बोलले ते करुन दाखवलं. पण मी मी काही बोलले नाही तरी माझंच नाव दिसायचं असं सांगत यावेळी त्यांनी पंकजाविषयी चांगलं नाही बोललं पाहिजे यासाठी काही लोकांना नेमलं होतं असा आरोप केला. तसंच सुत्रांची खिल्ली उडवताना, “इतके हुशार सूत्र असतील तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कळला कसा नाही. सुत्रांचीही मर्यादा असते,” असं म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pankaja munde late gopinath munde gopinathgad sgy
First published on: 12-12-2019 at 14:39 IST