राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भाजपा नेत्यांकडून टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जातो. जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ शी बोलताना पंकजा मुंडे यांनी चौकशी लावावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे असं म्हटलं.

पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, “जलयुक्त शिवार योजनेचा उद्धेश अत्यंत चांगला आणि लोकहिताचा आहे. चौकशी लावावी की नाही हा राज्य सरकारचा प्रश्न आहे. बीडमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा याचा किती फायदा झाला की हे लोकांना माहिती आहे. ही लोकांची योजना आहे”.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.

“सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं….त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं,” असं अजित पवार यांनी सांगितलं.