भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “जनतेने बहुमत दिलं नसतानाही ते सत्तेत आहेत. त्यामुळे सत्ता टिकवणं हे त्यांचं ध्येय आहे असं मला वाटतं,” असं त्या म्हणाल्या आहेत. आरक्षणाबाबत जे झालं आहे ते अत्यंत निराशाजनक आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच धनगर आरक्षण विषय हाताळण्यात सरकारने गती घेतली नसल्याची टीकाही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.
“एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वात प्रथम मी सरकारचं अभिनंदन करते. एक वर्ष पूर्ण होतं की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता. जनतेने बहुमत दिलेलं नसतानाही ते सत्तेत आहेत. त्यामुळे सत्ता टिकवणं हे त्यांचं ध्येय आहे असं मला वाटतं. जनतेचे हित दुय्यम अशी परिस्थिती आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. “करोनाचा सामना करणं सरकारसमोर आव्हान आहे. सरकारसाठी हे नक्कीच त्रासदायक आहे. जनहितासठी आम्ही सहकार्याची भूमिका नक्की ठेवू,” असं आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलं.
आणखी वाचा- महाविकास आघाडी सरकार जनमताविरुद्ध असतं तर…; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर शरसंधान
पुढे त्या म्हणाल्या की, “मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये याबद्दल आम्ही सर्वांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या मराठा आरक्षणाबाबत जे झालं आहे ते अत्यंत निराशाजनक आहे. मराठा तरुणांमध्ये, समाजात तीव्र संताप आणि खेद आहे. सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र शासनाकडे त्यासंबंधी प्रस्ताव पाठवला पाहिजे”.
“सात दशकांपासून धनगर समाज आरक्षणाची वाट पाहत आहे. र चा ड करण्यासाठी त्यांना ७० वर्ष वाट पाहावं लागत आहे हे दुर्देवी. हा विषय हाताळण्यात ससरकाने गती घेतली नाही. विषयाला हातच लावलेला नाही,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 10:50 am