सात पैकी पाच ऊसतोडणी कामगार संघटनांनी लवादाला विरोध केला आहे. याबाबतचे पत्र देखील राज्य सहकारी साखर संघाला पाठविण्यात आलेले असताना अंबाजोगाईतील कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांना एकवीस रुपये प्रति टन वाढ द्या अशी भूमिका घेऊन ऊसतोडणी कामगार, मुकादम, वाहतुकदार यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप सीटू ऊसतोड कामगार संघटनेचे मोहन जाधव यांनी केला. कुठल्याही संघटनेशी चर्चा नाही, बैठक झालेली नसताना एकवीस रुपये दरवाढीची भूमिका त्यांनी कोणत्या अधिकारातून घेतली असा सवालही संघटनांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड जिल्ह्यात महिनाभरापासून ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या संपावरुन राजकारण तापलेले आहे. भाजपने अधिकृतरित्या आमदार सुरेश धस यांच्यावर जबाबदारी सोपवलेली होती. धस यांनी राज्यभर दौरे करुन या प्रश्‍नावर ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतुकदारांच्या बैठका घेतल्या. दीडशे टक्के भाववाढ द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. ऊसतोड कामगारांच्या विविध अकरा संघटनांना सोबत घेऊन त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ऊसतोड कामगारांच्या अन्य संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली असुन पंकजा मुंडे या कामगारांची नव्हे तर कारखानदारांची बाजू घेतात असा आरोपही झालेला आहे. या संदर्भात सीटू प्रणित महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेसह अन्य पाच संघटनांनी राज्य सहकारी साखर संघाला पत्र पाठवून पंकजा मुंडे यांच्या लवादाला विरोध केला आहे. दोन दिवसापूर्वी पंकजा मुंडेंनी पत्रकार बैठकीत संपाचा मुद्दा उपस्थित करुन दर सांगण्यास नकार दिला होता.

मात्र अंबाजोगाईतील जाहीर सत्काराच्या कार्यक्रमात ऊसतोड मजुरांना एकवीस रुपये प्रति टन वाढ द्या अशी भूमिका घेतल्याने संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला. भाजप आमदार सुरेश धस यांनी माझ्यासह अकरा संघटना दीडशे टक्के दरवाढीच्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट करत संप सुरुच राहणार असल्याचे सांगितले. दि. 27 ऑक्टोंबर रोजी साखर संघासोबत होणार्‍या बैठकीत यावर निर्णय होईल असेही ते म्हणाले. तर सीटू प्रणित महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेचे मोहन जाधव यांनी म्हटले आहे की, पंकजा मुंडेंची भूमिका म्हणजे ऊसतोडणी कामगारांची घोर फसवणूक असुन त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. मागच्या कराराच्यावेळीही त्यांनी ऊसतोड मजूर, मुकादमांची फसवणूक केली व आताही त्या कामगारांच्या मुळावर उठल्या आहेत. 27 ऑक्टोंबरच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मोहन जाधव यांनी दिला.

पंकजांनी अर्ध्या हळकुंडात पिवळे होवू नये-प्रा.सुशिला मोराळे

पंकजा मुंडे सरकारमध्ये नाहीत. त्या लवादाच्या प्रमुख देखील नाहीत तरीही त्यांनी एकवीस रुपये दरवाढीची घेतलेली भूमिका कोणत्या अधिकारात बसते? असा प्रश्‍न उपस्थित करत ऊसतोड कामगार संघटनेच्या प्रा.सुशिला मोराळे यांनी त्यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे यांनी कोणत्याही बैठकीशिवाय हा निर्णय घेणे म्हणजे अर्ध्या हळकुंडात पिवळे होण्यासारखे आहे. त्यांनी नेहमीच कारखान्याच्या हिताचे रक्षण केल्याचा आरोपही मोराळे यांनी केला.

पंकजा मुंडेंचा आदेश मान्य असेल-केशव आंधळे

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सातत्याने ऊसतोड मजुरांच्या संदर्भात कल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंकजा मुंडे ऊसतोड मजुर, मुकादम, वाहतुकदार यांच्यासाठी कार्य करीत आहेत. सध्या सुरू असलेल्या संपाच्या बाबतीत पंकजा मुंडे योग्य निर्णय घेतील. लवाद म्हणुन त्या शरद पवारांसह जयंत पाटील यांनाही बोलल्या आहेत. काही मंडळी जाणीवपूर्वक कामगारांना वेठीस धरुन आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तो आम्ही सहन करणार नाही. पंकजा मुंडे देतील तो आदेश मान्य असेल असे गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतुकदार संघटनेचे मार्गदर्शक माजी आमदार केशव आंधळे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pankaja munde sugarcane trade union beed nck
First published on: 27-10-2020 at 16:07 IST