भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोसम सुरू झाला आहे. अलीकडच्या काही आठवडय़ांत जिल्ह्यातील बदल्यांमध्ये काँग्रेस व शिवसेनेची सरशी झाल्यानंतर ‘अर्थपूर्ण’ बदल्यांना चाप लावण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहे.
काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये दोन कार्यकारी अभियंते भोकर व देगलूर येथे आले. या दोन्ही अधिकाऱ्यांची ख्याती काँग्रेसधार्जीणे अशी असून देगलूरच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नियुक्तीत शिवसेना आमदाराने हातभार लावला. या पाठोपाठ याच खात्यात अधीक्षक अभियंत्याला आणण्यात काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या एका आमदाराच्या पत्राचा आधार घेतला.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या जागेवर दुसरा अधिकारी आणायचा होता; पण दुसऱ्याचीच नियुक्ती झाल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांत असंतोष पसरला.
गेल्या आठवडय़ात नांदेड मनपा आयुक्तांच्या बदलीत शिवसेना आमदारांचा ‘हात’ असल्याचे समोर आले. दुसऱ्या बाजूला देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांना तेथून घालविण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व शिवसेना यांनी संयुक्तपणे उचलला. महत्त्वाच्या जागांवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांत सरळसरळ सौदेबाजी होत असून भाजपची सत्ता असताना इतरांची चलती असल्याचे चित्र जिल्हाभर पसरले आहे.
मुख्यमंत्री वा संबंधित मंत्री केवळ आमदारांच्या पत्रांना प्राधान्य देत बदल्या करीत असल्याची ही ठळक उदाहरणे समोर आल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, जिल्हा सरचिटणीस गंगाधर यशवंत जोशी, पक्षाचे तरुण नेते राजेश संभाजी पवार तसेच व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुत्रे प्रभृतींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस, तसेच जिल्ह्याचे संपर्कमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले आहेत. देगलूरच्या मुख्याधिकाऱ्यांचे काम चांगले असून त्यांना वर्षभर तेथेच ठेवा, अशी जोशी यांची मागणी असल्याचे सांगण्यात आले.
नजीकच्या काळात जिल्ह्यामध्ये जिल्हा उपनिबंधक सह. संस्था, अधीक्षक अभियंता, महावितरण नांदेड मंडळ आदी काही महत्त्वाच्या पदांवर नवे अधिकारी नियुक्त करण्याचा विषय आहे. या पदांवर अधिकारी नेमताना काँग्रेस किंवा शिवसेनेची चलती नको, अशी भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे.
पोलीस अधीक्षकांनाही येथून बदलण्याची ‘पाटीलकी’ यापूर्वी दिसून आली; पण पोलीस अधीक्षक दहिया यांना तूर्त बदलू नये, अशी भाजपाची मागणी असून काँग्रेस व शिवसेना लोकप्रतिनिधींच्या सोयीनुसार होणाऱ्या बदल्यांना चाप बसला पाहिजे, अशी मागणी राजेश पवार यांनी मुंबईला जाताना केली.
जिल्ह्यात नवे अधिकारी देताना, पक्षाने नियुक्त केलेले संपर्कमंत्री मुनगंटीवार यांच्याशी विचारविनिमय व्हावा, असे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.