महिला मंत्र्यांच्या विरोधात भाजपचे सूडबुद्धीचे राजकारण

लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपचे सूडबुद्धीचे राजकारण सुरू केले आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला. भाजपच्या सत्तेत अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांनी राजीनामे का दिले नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

अमरावती जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत भाजपच्या नेत्यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन छेडले आहे. डॉ. सुधीर ढोणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून भाजप नेत्यांचा समाचार घेत काँग्रेसची भूमिका मांडली. न्यायालयाच्या निर्णयाची व नैतिकतेची जाणीव भाजप नेत्यांना कधीच नव्हती. तत्कालीन भाजप सरकारमधील मंत्र्यांवर न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर व सकृत दर्शनी भ्रष्टाचार दिसत असतानाही भाजप मंत्र्यांनी राजीनामे दिले नाहीत. भाजप सत्तेत पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, प्रकाश मेहता, विनोद तावडे, गिरीश बापट, विष्णू सावरा, जयकुमार रावळ, संभाजी निलंगेकर पाटील आदींसह अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. कॅगने जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवला. मात्र, नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्या भाजपने एकाही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही, अशी टीका डॉ. ढोणे यांनी केली. वास्तविक यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वामुळे भाजप नेस्तनाबूत होत असल्याचे शल्य त्या नेत्यांना अधिक आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा भाजपमुक्त केल्यानेच यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपने बदनामीची मोहीम सुरू केल्याचे डॉ. ढोणे म्हणाले. ठाकूर यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. वाहतूक पोलिसांसोबत अचानक घडलेल्या प्रसंगामुळे न्यायालयाने त्यांना तीन महिन्याची शिक्षा ठोठावली असली, तरीही उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा त्याच निर्णयात दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले