विरार : शहरात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने शहरात लसीकरणाला गती देण्यासाठी शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली आहे. पण आता या केंद्राचे श्रेय लाटण्याचे काम राजकीय पक्षांनी चालवले आहे. असाच एक प्रकार वसईच्या एव्हरशाइन सिटी परिसरात पाहायला मिळाला. पालिकेने नुकतेच या परिसरात ज्येष्ठ नागरिक कार्यालयात लसीकरण सुरू करण्याची तयारी दाखविली असताना भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकाने भाजपकडून हे केंद्र सुरू केल्याचे फलक समाजमाध्यमांवर पसरवत नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आमंत्रित केले. 

पालिकेने लसीकरण जलद गतीने आणि नागरिकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी मिळावे यासाठी शहरात लसीकरण केंद्रांत वाढ केली आहे. अशाच पद्धतीने वसई पूर्व एव्हरशाइन सिटी येथील ज्येष्ठ नागरिक कार्यालयात लसीकरण सुरू केले आहे. पण हे लसीकरण भाजपतर्फे असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी केले. त्यांनी या आशयाचा एक फलक तयार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी</span>, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस</span>, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या फोटोसह स्थानिक कार्यकर्त्यांचे  फोटो लावत ५ एप्रिलपासून हे केंद्र सुरू करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले.

पण मागील दोन दिवसांपासून येथे ज्येष्ठ नागरिक जात असून त्यांचे लसीकरण होत नसल्याने नाराज होऊन घरी परतत आहेत. या संदर्भात माजी नगरसेवक किरण भोईर यांनी लस केंद्राकडून येत असल्याने कोणी पक्षाचे नाव टाकले तर काय झाले, असे प्रसारमाध्यमांना सांगितले, तर नंतर काही वेळातच त्यांनी घूमजाव करत आपण हा फलक तयार केला नसल्याचे सांगितले. तर वसई-विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितले की, सदरचे केंद्र हे केवळ पालिकेचे असून त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणताही  संबंध नाही.