पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनीदेखील राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडेंच्या या मागणीला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दिला असून अधिवेशनात यावरुन भाजपा आक्रमक भूमिका घेणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय देण्यात आल्याने शिवसेनेत अंतर्गत वादळ असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.

“अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यपालांचं अभिभाषण यासहित इतर विषयांवरही चिरफाड करणार , मात्र वीजपुरवठा खंडित करणं हा मुख्य मुद्दा असणार आहे. मोफत वीजेचं बोलता, पण देत नाहीच…करोना काळात अवाजवी बिलं आली त्यांचंही काही केलं नाही. उलट वीज खंडित करत तुम्ही त्या शेतकरी, ग्राहकाच्या जखमवेर मीठ चोळण्याचं काम केलं. नोटीस नाही, बिल तपासलं नाही…मोगलाई लागलीये का?,” अशी संतप्त विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली.

आणखी वाचा- “अजित पवार मराठवाडा-विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यावर दगड मारून स्वागत करायला पाहिजे”

“बिल्डरला प्रीमियम देऊन सात, आठ हजार कोटी रुपये महसूल कमी करणार आणि वीजेच्या ग्राहकासाठी चार पाच हजार कोटी लागले तर ते उपलब्ध नाहीत. या विषयावर विधान परिषदेत हंगामा करणार,” असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

आणखी वाचा- वीज कनेक्शन तोडणीबद्दल अजित पवारांनी केली मोठी घोषणा; फडणवीसांनी मानले आभार

“संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेचा संताप होता. भाजपा ज्या पद्धतीने आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अधिवेशन होऊ न देण्याचा इशारा दिला त्यांनंतर यांना प्रतिमेची चिंता वाटू लागली आणि त्यातून तो राजीनामा घेतला. पंकजा मुंडेंची मागणी अत्यंत रास्त आहे. पहिलं आम्हाला वाटलं यांना सर्वांनाच वाचवायचं आहे. पण आता जर यांची नैतिकता जागी झाली असेल तर जो न्याय संजय राठोड यांना आहे, त्याच नैतिकतेवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी पंकजा मुंडेंची मागणी असेल तर ती बरोबर आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल,” असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

“शिवेसनेत यामुळे अस्वस्थता आहे. धनंजय मुंडेंना रक्षण देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. आपल्याही नेत्याला मंत्री म्हणून संरक्षण द्यावं अशी शिवसेनेची भूमिका होती. मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेची बाजू कमकुवत असल्याचं दिसत आहे. आपल्याला दिला तोच न्याय त्यांनाही हवा असं अंतर्गत वादळसुद्धा आहे. त्याचा परिपाक येणाऱ्या काळात दिसेल,” असं प्रवीण दरेकरांनी यावेळी सांगितलं.