राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांकडून सातत्याने सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजपाचे राज्यातील नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ सत्तेसाठी या प्रकरणांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारवर या प्रकरणावरून टीका करतानाच प्रवीण दरेकर यांनी आज मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण देखील केले.

pravin darekar protest on palghar mob lynching case
पालघर साधू हत्याकांड प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी आज मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण केले.

गडचिंचले गावात झालं होतं हत्याकांड!

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निघृण हत्या केली होती. या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, या प्रकरणात अद्याप दोषींना शिक्षा झाली नसल्याचा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. “पालघर साधू हत्याकांड प्रकरणात गतीने तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले महाविकास आघाडी सरकारने न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी या प्रकरणात न्याय मिळू शकलेला नाही”, असं दरेकर म्हणाले आहेत.

 

“हिंदुत्वाची मशाल विझली, आता फक्त धूर”

सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं आणि सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी”, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली आहे.

पहाटेच्या सरकारच्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन -संजय राऊत

दरम्यान, दुर्घटनास्थळी जाऊन हत्या झालेल्या साधु-महंतांना श्रद्धांजली देणार असल्याचं यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.