नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णालयात १५० रुग्ण दाखल होते. यामधील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? अशी विचारणा केली आहे.

गंभीर घटना! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

प्रवीण दरेकरांचं ट्विट
“निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितलं,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. दरम्यान याआधी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी मनपा आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

फडणवीसांकडून सविस्तर चौकशीची मागणी – 

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती –
“ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. याविषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे,” अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

दोषींवर कारवाई होणार –
रुग्णालयात १५० रुग्ण होते, यापैकी २३ रुग्ण व्हेंटिलेटर आणि इतर रुग्ण ऑक्सिजनवर होते अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली. यावेळी त्यांनी सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असं सांगितलं आहे.

पोलिसांचा फौजफाटा –
दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. करोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस गर्दी कमी करत आहेत. याशिवाय संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. तसंच नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित आहेत.