‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, अशा शब्दात भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. लातुरात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अमित शाह यांनी हे वक्तव्य केलंय. लातूर-नांदेड-हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ७१३ भाजपा पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित शाह यांनी स्वबळाचे स्पष्ट संकेत दिले. ‘युती होगी तो साथी को जितायेंगे नहीं हुई तो पटक देंगे’, असं अमित शाह भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धुळ चारु. त्यासाठी प्रत्येक बुथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. स्वबळावर निवडणुका लढवून भाजपा ४८ पैकी किमान ४० जागा जिंकेल असा दावाही अमित शाहांनी केला. २०१४ मध्ये युती नव्हती, तरीही फडणवीस मुख्यमंत्री झाले, याचीही आठवण त्यांनी करून दिली. युती झाली किंवा नाही झाली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकणार, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी व्यक्त केला. आगामी निवडणूक पानिपतच्या लढाईइतकीच महत्त्वाची असून, बूथ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचना शाह यांनी केली.

शाह म्हणाले, ‘‘संपूर्ण देशातील ९१ टक्के शक्तिकेंद्राच्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता आहे. विजयाने अहंकारी किंवा पराजयाने भयभीत होणारा भाजपचा कार्यकर्ता नाही. दहा सदस्यांपासून सुरुवात झालेल्या या पक्षाचे आता ११ कोटी सदस्य आहेत. २०१४ साली सहा राज्यांत भाजपचे सरकार होते. तेव्हा आपण केंद्रातील निवडणूक जिंकली. आता १६ राज्यांत आपली सरकारे आहेत. उत्तर प्रदेशात या वेळी ७३ ऐवजी ७४ जागी भाजपचे खासदार निवडून येतील. ओदिशा व बंगालमध्येही भाजपाचा विजय होईल.’’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही २०१४ पेक्षा २०१९ चा विजय मोठा असेल, असा विश्वास व्यक्त केला. २०१४ च्या निवडणुकीत दीड कोटी मतांवर १२२ जागा आल्या होत्या. केंद्र व राज्य सरकारच्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटींपेक्षा किती तरी अधिक आहे. फक्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले. रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वष्रे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाह यांच्या हस्ते करण्यात आला.

राफेलमध्ये चार आण्यांचाही भ्रष्टाचार नाही-
राफेलमध्ये चार आण्यांचाही भ्रष्टाचार झालेला नाही. ज्यांनी १२०० कोटी रुपयांचा कर बुडवला आहे व जे जामिनावर फिरत आहेत, ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत, अशी टीका शाह यांनी राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर केली. सर्वोच्च न्यायालयाने राफेलसंबंधी दिलेला निकाल स्पष्ट आहे. संसदेतील निर्मला सीतारामन यांचे भाषण सर्व कार्यकर्त्यांनी ऐकण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

शिवसेनेच्या स्वबळाच्या भूमिकेनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आगामी निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याने आता युतीचं काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.