13 July 2020

News Flash

लातूर आणि भाजप.. नवे समीकरण

अमित शहा यांनी लातूरची निवड केल्याने पक्षाने लातूरला विशेष महत्त्व दिल्याचे स्पष्टच आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी लातूरला दिलेल्या भेटीत त्यांनी मराठवाडय़ातील चार मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले.

प्रदीप नणंदकर, लातूर

लातूर म्हणजे काँग्रेस हे आधीच्या काळात समीकरण तयार झाले होते. विलासराव देशमुख, शिवराज पाटील, शिवाजीराव निलंगेकर-पाटील या नेत्यांनी काँग्रेसची पाळेमुळे घट्ट केली. पुढे हा बालेकिल्ला ढासळला. भाजपने आता लातूरमध्ये बस्तान बसविले आणि लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत पक्षाने यश मिळविले. लातूर म्हणजे काँग्रेस हे समीकरण बदलले आणि आता लातूर.. भाजप हे नवे समीकरण तयार झाले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी लातूरला दिलेल्या भेटीत त्यांनी मराठवाडय़ातील चार मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. अमित शहा यांनी लातूरची निवड केल्याने पक्षाने लातूरला विशेष महत्त्व दिल्याचे स्पष्टच आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघात भाजपने विजय मिळविला होता. तसे २००४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रुपाताई निलंगेकर यांनी शिवराज पाटील यांचा पराभव केला होता. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरचा काँग्रेसचा किल्ला आणखी पोकळ होत गेला. लातूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद जिंकून भाजपने आपली ताकद दाखवून दिली. पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी जिल्ह्य़ात पक्षाला यश मिळवून दिले.

लातूरमध्ये भाजपने चांगली ताकद दाखविल्यानेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बूथ मेळाव्यासाठी लातूरची निवड केली होती. गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेले काम व राज्यातील देवेंद्र सरकारने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवले तर प्रत्येक निवडणुकीत आपल्याला विजय आणि विजयच मिळणार आहे. हा मीपणाचा भाव नसून सर्वानी मिळून केलेल्या कामाचा आत्मविश्वास आहे अशा शब्दात शहा यांनी लातूरमधील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

रविवारी लातूर, उस्मानाबाद, नांदेड व िहगोली या चार जिल्हय़ांतील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या मेळाव्यास त्यांनी संबोधन केले व सायंकाळी बुद्धिवंतांच्या कार्यक्रमातही मार्गदर्शन केले. देशातील सर्व लोकसभा मतदारसंघात शंभर बुथ क्लस्टरचे मेळावे करण्यात येणार असून त्यापैकी ६० मेळाव्यांना आपण स्वत उपस्थित राहणार आहोत, असे सांगत महाराष्ट्रातील पहिला मेळावा लातूर येथे होत असल्याचे शहा यांनी सांगितले. निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना १३ कार्यक्रम आगामी काळासाठी देण्यात आले असून या कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखीन एखादा कार्यक्रम करण्यास आपली हरकत नाही, असे सांगून हे कार्यक्रम म्हणजे कार्यकर्त्यांची गीता व ज्ञानेश्वरी असल्याचे ते म्हणाले. देशात १६२५ पेक्षा अधिक राजकीय पक्ष आहेत. यातील लोकशाहीची जपणूक करणारा एकमेव भाजप हाच पक्ष असल्याचे सांगत बाकी सगळी मंडळी एका मर्यादित घराण्यापुरती असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

राजकारण पदार्थविज्ञान नाही तर रसायनशात्र

लग्नासाठी मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ अशी अट आहे. १८ वर्षांच्या मुलीसमोर एक वर्षांची २१ बालके समोर ठेवून लग्नाला संमती मागितली तर ते चालेल का? राजकारणात एक अधिक एक दोन नसते. येथे पदार्थविज्ञान चालत नाही तर रसायनशात्र चालते, असे सांगत नरेंद्र मोदींच्या समोर महाआघाडीतील नेते म्हणजे एक वर्षांची बालके असल्याचा टोला शहा यांनी लगावला, त्यामुळे उपस्थितांमध्येही या अनोख्या उदाहरणाची चर्चा रंगली.

अशोक चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी

अमित शहा यांच्या भाषणाच्या वेळी नांदेडच्या कार्यकर्त्यांनी ‘आदर्शवाले को पकडो’ अशी घोषणाबाजी केली. तेव्हा अमित शहा यांनी ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत यावेळी हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या चारही जागा जिंकण्यासाठी कटिबद्ध व्हा असे आवाहन त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 2:04 am

Web Title: bjp president amit shah visited latur for guidance in workers meetings
Next Stories
1 गुंड नाचवत आमच्या नादाला लागू नका – राणे
2 भाजपच्या आधी मी भारतीय जनतेचा आहे -शत्रुघ्न सिन्हा
3 साहित्य संमेलनावर निमंत्रितांचे बहिष्कारास्त्र
Just Now!
X