महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्या आहेत. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे पी नड्डा यांनी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हजर होते. भाजपाने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. याची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही असा संकल्पच केला पाहिजे.  एकटी भाजपा महाराष्ट्रात कमळ आणणार, प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागा. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल यासाठी प्रयत्न करा,” असं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- “रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, मात्र कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात”

‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्थासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. भाजपा वारंवार त्यांना उघडं पाडत आहे. निर्लज्जपणे आणि स्वार्थासाठी हे सरकार चालवलं जात आहे. सरकारमध्ये अंतर्विरोध आहे. करोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलेलं असून हे लोकांसमोर आणलं पाहिजे. कोविडची स्थिती हाताळतानाही त्यांनी घोटाळा केल्याचं मला कळालं आहे,” असा गंभीर आरोप जे पी नड्डा  यांनी केला आहे.

आणखी वाचा- “यांना इतकंही माहिती नाही”; उद्धव ठाकरे, राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्य सरकारवर टीका केली आहे. “आपल्या अपयशावरुन लक्ष हटवण्यासाठी वारंवार सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्याचं तुणतुणं वाजवलं जात आहे. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडण्यास सक्षम आहात. अंतर्विरोधानेच सरकार पडणार आहे.  त्यानंतर महाराष्ट्राचे भवितव्य काय ठरवून दाखवू. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. हे बेईमानीने आलेलं सरकार आहे.  जनेतेने आम्हाला आणि सोबत असणाऱ्या पक्षां निवडून दिलं होतं,” असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भाजपाचा डीएनए संघर्षाचा असून जनतेसाठी संघर्ष करत राहू असंही ते म्हणाले आहेत.