नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ होवू शकणार नाही अशी भावना शेतक-यांमध्‍ये निर्माण झाली असल्‍याने, योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी? असा प्रश्‍न राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. तसेच योजनेतील निकष बदलण्यासंदर्भात पत्रात विनंती केली आहे.  योजनेपासुन परावृत्‍त होत असलेल्‍या शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतील नव्‍या प्रमाणकांचा (ट्रीगर) तातडीने फेरविचार करुन सुधारित निकष जाहीर करावेत अशी मागणीही त्‍यांनी पत्राव्‍दारे मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.

फळपीक नुकसान संरक्षण कालावधीत भरपाई प्राप्‍त होण्‍यासाठी निश्चित केलेले प्रमाणके (ट्रीगर) हे वास्‍तव हवामान परिस्थितीच्‍या विपरीत आहेत. पूर्वी या योजनेसाठी पावसाचा निकष दोन दिवसांसाठी होता, शिवाय पावसाचा खंड हे प्रमाणक होते. सर्वसाधारणपणे कमी पावसाच्‍या व कोरडवाहू हवामान असलेल्‍या भागातील शेतकरीच प्रामुख्‍याने फळपीकांची लागवड करत असतो. वित्‍तीय संस्‍थाकडून कर्ज घेवून या फळपी‍कांची जोपासना केली जात असल्‍याने, दरवर्षी कर्जदार शेतक-यांना फळपीक विमा योजनेतील सहभाग सक्‍तीचा केला जातो. यावर्षी मात्र कर्जदार व बिगरकर्जदार शेतक-यांचा सहभाग ऐश्चिक ठेवण्‍यात आला आहे.

आणखी वाचा- सेना-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आमदार पाटील यांचा निशाणा

आणखी वाचा- जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून चाकरमान्यांची कोंडी करण्याचा सरकारचा प्लॅन?; आशिष शेलारांचा सवाल

सदर बाब‍ शेतक-यांबरोबरच बॅंकांनासुध्‍दा कर्जवसुलीसाठी अडचणीची ठरेल असे निदर्शनास आणून देतानाच फळपीकांच्‍या भरपाईसाठी निश्चित केलेले प्रमाणके स्‍थानिक हवामानाच्‍या विपरीत असून, विमा योजनेचा मूळ हेतूच या नव्‍या निकषांमुळे संपुष्‍टात आलेला आहे. चालू वर्षीच्‍या प्रमाणकांमुळे शेतक-यांचा या योजनेतील सहभाग कमी होण्‍याची भिती असून योजनेत सहभाग घेतलेल्‍या शेतक-यांनासुध्‍दा तुटपुंज्‍या भरपाईवरच समाधान मानावे लागणार असल्‍याने फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी असा प्रश्‍न विखे पाटील यांनी पत्रातून उपस्थित केला आहे.