राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही तर धंदा केला असा गंभीर आरोप भाजपा नेते राम शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं इथे आणून ते विकत असून समाजकारण नाही तर धंदा करण्यासाठी आले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. अहमदनगरला कर्जत येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर भाष्य करत सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडल्याचा आरोप केला.

“मी केलेल्या कामांचं भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते झालं असताना ते पुन्हा भूमिपूजन करत आहेत. तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली,” अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला. “बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली आहे,”असंही ते म्हणाले. नवीन पर्व असं काही नसून सगळं खोटं असल्याची टीकाही त्यांनी केली.

आणखी वाचा- रोहित पवारांनी केलं एकनाथ खडसेंचं स्वागत; म्हणाले, “…पण निसर्गाचाच नियम आहे”

राम शिंदे यांनी यावेळी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु असून याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे”.